Anju pakistan | अंजू हिची भारतात हत्या होण्याची शक्यता?; नसरुल्लाह याचे नवे दावे काय?
अंजू आणि नसरुल्लाह यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही देशात या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू असून आता या दोघांनी निकाहही केला आहे.
कराची | 28 जुलै 2023 : भारतीय महिला अंजू हिने पाकिस्तानातील तरुण नसरुल्लाह याच्याशी निकाह केला आहे. अंजू हिने धर्मांतरही केलं आहे. तिचा निकाहनामा व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या प्रेम कहाणीची भारत आणि पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन मुलांना सोडून अंजू पाकिस्तानात गेली. त्यानंतर तिने नसरुल्लाहशी निकाह केला आहे. आता या प्रकरणात अंजू आणि नसरुल्लाहकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. नसरुल्लाहने तर अंजूची भारतात हत्या होऊ शकते, अशी भीतीच व्यक्त केली आहे.
नसरुल्लाह याच्या दाव्यानुसार पाकिस्तान सरकार अंजूला सरकारी नोकरी देणार आहे. तसेच तिला घरही देणार आहे. काही दिवसात अंजू भारतात येईल. भारतात ती मुलांसाठी येणार आहे. मुलांना पाकिस्तानात घेऊन जाण्यासाठी ती भारतात येणार आहे. अंजू पाकिस्तानातून भारतात गेल्यानंतर ती परत आली नाही तर तिला घेऊन येण्यासाठी मी स्वत: भारतात जाईल, असं नसरुल्लाह याने म्हटलं आहे.
पाकची नागरिकत्व मिळणार
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली आहे. अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार आहे. तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याने तिला पाकिस्तानचे नागरिकत्वही मिळणार आहे. अंजू जे काही करत आहे ते तिच्या इच्छेनुसार करत आहे. ती ऑगस्टमध्ये भारतात येईल. मुलांना घेऊन ती परत पाकिस्तानला येईल, असं नसरुल्लाह म्हणाला.
मुलांचं धर्मांतर नाही
भारतात अंजूची हत्या होऊ शकते, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. मी भारतात गेल्यावर माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असं अंजूने मला सांगितलं. ती भारतातून परत आली नाही तर मी स्वत: भारतात जाऊन तिला घेऊन येईल. तिच्या मुलांनाही सोबत घेऊन येईल, असं सांगतानाच तिच्या मुलांचं धर्मांतर करणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
घटस्फोटासाठी अर्ज
अंजूवर कोणताच दबाव टाकण्यात आलेला नाही. तीन वर्षापासून ती तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. तिने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिकाही दाखल केली आहे, असं सांगतानाच केवळ मुलांसाठीच अंजू भारतात जाणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.