कॅनडात हिंदूंवर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला, पंतप्रधान मोदींनी फटकारले
कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी हिंसाचाराचा निषेध केला आणि म्हटले की खलिस्तानी अतिरेक्यांनी "लाल रेषा" ओलांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Canada Hindu Temple Attack : कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाराजी व्यक्त केलीये. या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. हल्ल्यांमुळे भारताचा संकल्प कमकुवत होणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी कॅनडा सरकारकडून न्याय सुनिश्चित करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची अपेक्षा व्यक्त केलीये.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटले की, कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आपल्या मुत्सद्दींना धमकावण्याचा प्रयत्नही तितकाच निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. आम्हाला आशा आहे की कॅनडा सरकार न्याय सुनिश्चित करेल आणि कायद्याची अंमलबजावणी करेल.
कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अहवालानुसार, ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिराबाहेर आंदोलक खलिस्तान समर्थक बॅनर घेऊन उभे होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांवर हल्ला करताना आणि लाठ्या काठ्याने हल्ला करताना दिसत आहेत. ही घटना मंदिराच्या परिसरात घडल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेसनेही या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारला कॅनडाविरोधात जोरदार आवाज उठवण्याची विनंती केली. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, भाविकांना मंदिरात जाण्यापासून कसे रोखले जात आहे, खलिस्तान समर्थक लोक बाहेर घोषणा देत आहेत आणि हिंसक निषेध करत आहेत. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
It’s absolutely unacceptable how Khalistani Goons were able to attack innocent Women and Child at the Hindu Sabha Mandir, even though the police were at the scene. ZERO ARRESTS were made so far. #hindulifematters #hindusabha #HinduSabhaMandir pic.twitter.com/k6upzJN5Wa
— Gurkiran Brar 🪯 (@UnfilteredSevak) November 3, 2024
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या हल्ल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलीये. हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एक निवेदन जारी करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत कॅनडातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत खूप चिंतित आहे आणि कॅनडाच्या सरकारला धार्मिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन करतो.