Bangladesh Hindus : बांग्लादेशमध्ये हिंदू खतरे में, चिन्मय प्रभू यांना अटक, हिंदुंच्या शांती सभेवर क्रूर हल्ला
Bangladesh Hindus : चिन्मय कृष्ण दास यांना ढाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे बांग्लादेशातील हिंदुंच्या मनात प्रचंड आक्रोश आहे. या अटकेविरोधात हिंदुंनी शांती सभांच आयोजन केलं होतं. पण त्यावर बांग्लादेशातील कट्टर पंथीयांनी क्रूर हल्ले केले. रात्री उशिरा हजारो हिंदुंनी जय सिया राम आणि हर हर महादेवचा जयघोष करत मौलवी बाजारमध्ये मशाल रॅली काढली.
बांग्लादेशच्या चटगांव इस्कॉन पुंडरीक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णन दास यांच्या अटकेनंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. यावेळी हिंदुंवर BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यात 50 हिंदू जखमी झाले आहेत. रात्री उशिरा हजारो हिंदुंनी जय सिया राम आणि हर हर महादेवचा जयघोष करत मौलवी बाजारमध्ये मशाल रॅली काढली. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेनंतर बांग्लादेशात हिंदु अल्पसंख्याक समुदायाने प्रत्येक जिल्ह्यात शांती सभांच आयोजन केलं होतं. या शांती सभेवर कट्टरपंथीय गटांनी क्रूर हल्ले केले. इस्लामिक समूहांनी चटगांवमध्ये हिंदू समुदायाच्या सदस्यांवर हल्ले केले.
ढाका येथील शाहबागमध्ये शांती सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हिंदू समुदायाच्या लोकांवर हल्ले केले. चटगांव विश्वविद्यालयाचे प्रोफेसर कुशाल बरन यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुशाल बरन गंभीर जखमी झाले आहेत. कट्टरपंथीय समूहांनी केलेल्या हल्ल्यात अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. या कट्टरपंथीयांकडून हल्ले सुरु असताना प्रशासन आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. प्रशासन पूर्णपणे मूकदर्शक बनून राहीलं. शाहबागमध्ये झालेल्या हल्ल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यातून हल्ला किती भयानक होता, ते दिसतं.
तात्काळ पावलं उचलण्याची विनंती
बांग्लादेश पोलिसांनी सोमवारी ढाकाच्या हजरत शाहजलाल इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक केली. केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी X वर पोस्ट केलीय. बांग्लादेशातील सनातनी हिंदू नेता, इस्कॉन मंदिराचे भिक्षू आणि बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्यकांचा आवाज चिन्मय प्रभु यांना ढाका पोलिसांनी अटक केली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार चिन्मय प्रभू यांना सोमवारी दुपारी ढाका पोलिसांनी ढाका एअरपोर्ट्वरुन अटक केली. “चिन्मय प्रभू यांना अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली, त्याचा निषेध करतो. ते बांग्लादेशातील सनातनी हिंदू समुदायाच्या अधिकारांसाठी अथक प्रयत्न करत होते. माझी परराष्ट्र मंत्री जय शंकर यांना विनंती आहे की, त्यांनी कृपया हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ पावलं उचलावीत” असं सुकांत मजूमदार यांनी पोस्टमध्ये म्हटलय.