बांग्लादेशात दुर्गा पूजा उत्सवावर समाजकंटकांचे हल्ले, पंतप्रधान शेख हसीनांचा भारताला इशारा
बांग्लादेशात बुधवारी कोमिल्ला जिल्हातील दुर्गा पूजा उत्सवादरम्यान मंडपाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. दुर्गा पूजा मंडप तोडफोड़ आणि हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा पंतप्रधान शेख हसीना यांनी निषेध केला आहे.
ढाका: बांग्लादेशात बुधवारी कोमिल्ला जिल्हातील दुर्गा पूजा उत्सवादरम्यान मंडपाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. दुर्गा पूजा मंडप तोडफोड़ आणि हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा पंतप्रधान शेख हसीना यांनी निषेध केला आहे. शेख हसीना यांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना इशारा दिला आहे. समाजविरोधी कृती करणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरी तिला सोडलं जाणार नाही, असं शेख हसीना म्हणाल्या. बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी याशिवाय भारताला देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बीबीसी बांग्लाच्या रिपोर्टनुसार शेख हसीना यांनी भारतात अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये ज्यानं बांग्लादेशातील हिंदू समुदायावर परिणाम होईल, अशी आशा हसीना यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या चांदीपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्यात बुधवारी दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान झालेल्या जातीय हिंसाचारात तीन लोकांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका फेसबुक पोस्टमध्ये कुराणचा कथित अपमान केल्यामुळे हिंसाचार उसळला होता. यानंतर अनेक दुर्गापूजा पंडालची तोडफोड करण्यात आली होती.
भारतात असे काही घडू नये
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, जगभरात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. केवळ आपला देशच नाही तर शेजारील देशांनीही याबाबत सावध असले पाहिजे. भारताने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्हाला खूप मदत केली आहे आणि यासाठी आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहू. परंतु भारतात देखील असे काही होऊ नये ज्यामुळे त्याचा आपल्या देशावर परिणाम होईल. आपल्या देशातील हिंदू समाजाच्या लोकांना नुकसान होईल, अशा घटना घडू नयेत म्हणून थोडी काळजी घेण्याची गरज आहे, असं शेख हसीना म्हणाल्या.
बांग्लादेशच्या प्रगतीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी समाजकंटकांना जोरदार फटकारले. दुर्गा पूजेच्या मंडपावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. हे असे लोक आहेत जे इतरांचा विश्वास जिंकत नाहीत आणि ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विचारधारा नाही, त्याच लोकांकडून असे हल्ले होतात, असं शेख हसीना म्हणाल्या. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना आम्ही नक्कीच शोधू. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आम्ही हे भूतकाळातही केले आहे आणि भविष्यातही करत राहू. त्यांना कडक शिक्षा दिली जाईल, असं शेख हसीना यांनी ठणकावलं. अशा समाजविघातक घटकांविरुद्ध सामान्य नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही शेख हसीना यांनी लोकांना केले. बांग्लादेशातील लोक सर्व सण -उत्सव जात -धर्माची पर्वा न करता एकत्र साजरे करतात. धर्म कोणत्याही मनुष्यासाठी वैयक्तिक आहे परंतु सण हे समाज आणि लोकांसह साजरे केले जातात, असं शेख हसीना म्हणाल्या. बांगलादेश विकासाच्या दिशेने वेगाने पावले टाकत असताना ही घटना घडली आहे. या घटनेचा उद्देश आपल्या देशाच्या प्रगतीला हानी पोहचवणे आहे. काही लोक धार्मिकदृष्ट्या अंधश्रद्धाळू असतात आणि ते नेहमी जातीय तणाव किंवा हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारचे लोक केवळ मुस्लीम समाजातच नाहीत तर इतर धर्मातही आहेत, असं शेख हसीना म्हणाल्या.
स्वत: ला अल्पसंख्यांक समजू नका
बांगलादेशच्या हिंदू समुदायाच्या लोकांनीही मंडपावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे आपली चिंता व्यक्त केली. बांगलादेश पूजा उत्सव परिषदेचे अध्यक्ष मिलन कांती दत्त म्हणाले की, पूजा पंडलवरील हिंसाचारामुळे देशभरातील हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हिंदूंवर पद्धतशीर हल्ले होत आहेत आणि त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे, असं मिलन कांती म्हणाले. बांगलादेश हिंदू एकता परिषदेनेही या प्रकरणी ट्विट केले आहे. कौन्सिलने ट्विटमध्ये म्हटले आहे, ’13 ऑक्टोबर 2021 हा बांगलादेशच्या इतिहासातील निंदनीय दिवस होता. अष्टमीच्या दिवशी मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने अनेक पूजा मंडपांची तोडफोड करण्यात आली. हिंदू आता पूजा मंडपांचे रक्षण करत आहेत,असं ट्विटमध्ये म्हटलं गेलं आहे.
शेख हसीना यांनी हिंदू समाजातील लोकांनी स्वतःला अल्पसंख्यांक मानू नये, असं आवाहन केलंय. इतर धर्मांच्या अनुयायांप्रमाणे त्यांनी त्यांचे धार्मिक उपक्रम चालू ठेवावे, असंही त्या म्हणाल्या. 1971 च्या युद्धात हिंदूंनीही खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे आणि त्यांना इतर धर्मांच्या लोकांसारखेच अधिकार आहेत, असं त्या म्हणाल्या. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी ढाका येथील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आपल्या संबोधनात त्या म्हणाल्या की कोमिला जिल्ह्यातील घटनेची चौकशी केली जात आहे. ज्याने हिंदू मंदिरे आणि दुर्गापूजा मंडपावर हल्ला केला, त्यापैकी कोणालाही सोडले जाणार नाही. या समाजकंटकांचा धर्म काय होता हे महत्त्वाचे नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं शेख हसीना म्हणाल्या.
शेख हसीनांच्या भूमिकेचं स्वागत
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी आयोजित साप्ताहिक पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. “आम्ही बांगलादेशमध्ये धार्मिक समारंभांदरम्यान हिंसाचाराच्या बातम्या पाहिल्या आहेत. बांगलादेश सरकारने तातडीने कारवाई केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दले तैनात केली. दुर्गा पूजा सोहळा बांगलादेश सरकार आणि तेथील लोकांच्या सहकार्यानेच शक्य झाला. आम्ही बांगलादेश सरकारच्या सतत संपर्कात आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय.
इतर बातम्या:
धक्कादायक, दोन वर्षाच्या मुलाच्या हातात बंदुक लागली, झूम मिटिंगमध्ये असलेल्या आईवर गोळी झाडली
bangladesh pm sheikh hasina warns india over dugra puja celebration violence happen on 13 october