पक्ष्याचा उडण्याचा नवा रेकॉर्ड! जे एका दमात विमानाला शक्य नाही, पण काय या पक्ष्याने सलग 11 दिवसाचा प्रवास, प्रतितास 51 किमीच्या वेगाने पार केला?
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या पक्ष्याने हा विक्रम केला आहे तो अवघ्या 5 महिन्यांचा आहे.
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये एका पक्षाने नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. गॉडविट या पक्षाने हा विक्रम प्रस्थापित केलाय. अलास्काहून ऑस्ट्रेलियातील टास्मानिया राज्यात किमान 13 हजार 560 किलोमीटर (8,435 मैल) अंतरावरून उड्डाण केल्याचा हा विक्रम आहे. यासंबंधातली माहिती एका पक्षीतज्ज्ञाने दिलीये. गॉडविट या पक्षाने अलास्का ते टास्मानिया विनाथांबा 11 दिवसांत प्रवास केलाय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या पक्ष्याने हा विक्रम केला आहे तो अवघ्या 5 महिन्यांचा आहे.
पक्षीतज्ज्ञांनी या पक्षाला टॅग केले होते, जेणेकरून त्याच्या लोकेशन बद्दल माहिती उपलब्ध होईल आणि वैज्ञानिक नोंदींसाठी संपूर्ण रूट-मॅप गोळा करता येईल.
बऱ्याच बेटांवरून हजारो किलोमीटर अंतरावर बार-टेल्ड गॉडविट गेला, पण त्याने त्याचा प्रवास कुठेही थांबवलेला नाही.
या गॉडविटने 13 ऑक्टोबर 2022 रोजी अलास्का मधून उड्डाण केले आणि 24 ऑक्टोबर रोजी तो ईशान्य टास्मानियातील आयन्सन्स बे मधल्या जमिनीवर उतरला.
प्रवासाच्या नकाशावरून असे दिसते की, हा इवलुसा पक्षी या ११ दिवसांत चक्क कुठेही थांबलेला नाही. वाटेत ओशनिया, वानुआतू आणि न्यू कॅल्डोनियासारखी बेटंही त्याला सापडली, पण तिथे राहण्याऐवजी त्याने थेट टास्मानिया गाठलं, जणू काही हा त्याचा संकल्पच होता.
जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ऑर्निथोलॉजीच्या आकडेवारीनुसार, या पक्षाचं वय पाच महिन्यांचे आहे. अशा प्रकारे या छोट्या पक्ष्याने पहिल्या नर ‘4BBRW’ चे दोन विक्रम मोडलेत.
ज्याने 2020 मध्ये अलास्कापासून न्यूझीलंडपर्यंत 12,854 किमी अंतर पार केले. त्यानंतर 2021 मध्ये याच मार्गावरून 13,050 किमीचा प्रवास करून स्वतःचाच विक्रम मोडला.
पण, आता गॉडविटने अवघ्या 5 महिन्यांच्या वयात हे सर्व रेकॉर्ड मोडलेत. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने गॉडविटच्या या सर्वात लांबच्या स्थलांतर रेकॉर्डची नोंद केली आहे.