Syria Civil War : सीरियात गृहयुद्ध का भडकलं? आतापर्यंत काय-काय घडलं? यात भारताचा फायदा की तोटा?
Syria Civil War : सीरियात गृहयुद्धाची सुरुवात का झाली? सीरियामध्ये कधीपासून बाशर अल-असाद यांच्या कुटुंबाची सत्ता होती? सीरियात जे घडलय, त्यामुळे भारताला फायदा होणार की नुकसान? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या लेखातून समजून घ्या. एक नेत्ररागतज्ञ असलेला माणूस राजकारणात कसा आला? इतक्या सर्वोच्च सत्तापदापर्यंत कसा पोहोचला?
15 वर्षाच्या गृह युद्धानंतर बाशर अल-असाद यांना सत्तेवरुन बेदखल करण्यासाठी फक्त 15 दिवस लागले. रविवार 8 डिसेंबरला बंडखोरांच्या फौजांनी सीरियाची राजधानी दामास्कसवर ताबा मिळवला. बंडखोरांनी सीरियाच्या राजधानी प्रवेश करताच बाशर अल-असाद कुटुंबियांसह देश सोडून पळून गेले. ते रशियात आश्रयाला गेल्याची दाट शक्यता आहे. कारण सीरियाच हे गृहयुद्ध इतकी वर्ष खेचलं गेलं, बाशर आपली सत्ता टिकवू शकले ते रशियाच्या मदतीमुळेच. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या संघर्षात त्यांना साथ दिली. पण रशिया आता आपल्या युद्धात अडकला आहे. इराणचा इस्रायलबरोबर संघर्ष सुरु आहे. युक्रेन युद्ध अजून कधीपर्यंत चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे बंडखोरांच्या फौजा सीरियामधील एक-एक शहर ताब्यात घेत असताना रशिया आणि इराणकडून बाशर यांना मदत मिळू शकली नाही.
बंडखोरांच सैन्य सीरियामधील एक-एक शहर ताब्यात घेत असताना सीरियन सैनिकांनी शस्त्र टाकण्यास सुरुवात केली. अखेर बंडखोरांनी दमास्कसमधून सीरिया ताब्यात घेतल्याचा काल संदेश दिला. जवळपास 50 वर्षानंतर सीरियामधील बाशर अल-असाद यांच्या कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली आहे. इतकी वर्ष सीरियावर या कुटुंबाने एकछत्री अमल केला. बाशर अल-असाद यांची पिछेहाट सुरु असताना तिथली जनता रस्त्यावर उतरुन आंनदोत्सव साजरा करत होती. सीरियामध्ये या गृह युद्धाची सुरुवात 2011 साली झाली होती. हयात तहरीर अल शाम हा सीरियामधील बंडखोरांचा सर्वात मोठा गट आहे. 27 नोव्हेंबरला त्यांनी बाशर सरकार विरुद्ध लढाईची सुरुवात केली होती. हयात तहरीर अल शाम सोबत अन्य छोटे-छोटे गट सुद्धा या लढाईत उतरले होते. हयात तहरीर अल शाम सोबत लढणाऱ्या गटांची विचारधारा वेगवेगळी आहे. पण असद यांना सत्तेवरुन हटवण्याच्या या एकाच उद्देशाने हे सर्व गट एकत्र आले आहेत
सीरियमधील हे गृहयुद्ध पाहता कोण-कोणासोबत लढतय आणि का? असे प्रश्न पडू शकतात. अमेरिका, रशिया, इराण, टर्की आणि इस्रायल असे अनेक देश या लढाईमध्ये आहेत, हे सर्व देश का गुंतले आहेत? असाद यांचं शासन इतका काळ कसं चाललं, आतापर्यंत काय झालं? यापुढे काय होणार? असाद स्वत: कुठे गेलेत? आणि असाद यांच्याबद्दल भारताचा दृष्टीकोन काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधूया.
कधीपासून असाद कुटुंबाच सीरियावर वर्चस्व?
सन 1971 पासून सीरियावर असाद कुटुंबाच्या नियंत्रणाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्ष हाफीझ अल-असाद यांनी सर्वप्रथम सीरियावर नियंत्रण मिळवलं. हाफीझ अल-असाद राष्ट्राध्यक्ष असले, तरी त्यांच्याकडे हुकूमशाह म्हणून पाहिलं जायचं. हाफीझ यांना 2000 साली मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा बाशर अल-असादच्या हाती सत्तेची सूत्र आली. 2011 साली अरब स्प्रिंगची सुरुवात झाली. पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये हुकूमशाहची सत्ता जनतेने उलथवून टाकली. हीच लाट सीरियापर्यंत पोहोचली. असाद यांच्या सरकारविरोधात आंदोलन सुरु झालं.
मूठभर श्रीमंत वर्गाला फायदा
असाद हे अलाविते समाजाचे होते. शिया मुस्लिमांमध्ये हा समाज मोडतो. सीरियामध्ये सुन्नी बहुसंख्य असूनही सत्ता आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे सर्व स्त्रोत अलाविते समाजाच्या हाती असल्याची सुन्नी मुस्लिमांची भावना होती. सत्तेवर आल्यानंतर असाद यांनी अर्थव्यवस्था मुक्त केली. पण ठराविक मूठभर श्रीमंत वर्गाला याचा फायदा झाला. बाशर अल असाद यांच्याविरोधात शांततामय मार्गाने आंदोलनाला सुरुवात झाली होती. महागाई आणि बेरोजगारी हे आंदोलकांचे प्रमुख मुद्दे होते.
असं झालं आंदोलनाच रुपांतर गृहयुद्धात
बाशर अल-असाद यांच्या शासनाला हे शांततमय मार्गाने सुरु असलेले आंदोलन हाताळता आले नाही. आंदोलन मोडून काढण्यासाठी असाद यांनी कठोर पावलं उचचली. परिणामी सीरियात या आंदोलनाच रुपांतर गृहयुद्धात झालं. अनेक सशस्त्र गट हे गृह युद्धात उतरले. बाहेरुन त्यांना वेगवेगळ्या देशांकडून पाठिंबा होता. वेगवेगळी उद्दिष्टय होती. पण एक उद्देश समान होता, तो म्हणजे असाद यांना सत्तेवरुन खाली खेचणं. त्यासाठीच वेगवेगळी विचारधारा असूनही हे सर्व गट एकत्र आले.
बाशर अल-असाद यांनी इतकी वर्ष बंडखोरांना कसं रोखलं?
गृहयुद्ध सुरु झाल्यानंतर बंडखोरांनी सीरियाच्या उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिम भागावर नियंत्रण मिळवलं. सीरियाचा मोठा भाग अजूनही बाशर यांच्या नियंत्रणाखालीच होता. 2015 साली बाशर अल-असाद यांना रशियाने हवाई सपोर्ट दिला आणि इराणच्या मदतीने त्यांनी बंडखोरांना रोखण्यात यश मिळवलं. 2020 पासून हे गृहयुद्ध थांबल होतं, ज्याच्या ताब्यात जो प्रदेश होता, त्यावर त्याच नियंत्रण अशा पद्धतीने कारभार सुरु होता. पण 27 नोव्हेंबरपासून अचानक सरकार विरोधी गट आक्रमक झाले. त्यांनी बाशर यांच्या हातातून सीरियाची मोठी शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
सीरियामधील सर्वात मोठा गट कोणता? त्यांचा नेता कुठला?
सीरियामध्ये बंडखोरांचे वेगवेगळे गट बाशर अल-असाद यांच्या शासनाविरुद्ध लढत असले, तरी हयात तहरीर अल शाम हा तिथला सर्वात मोठा बंडखोरांचा गट आहे. अबू मोहम्मद अल-जोलानी हयात तहरीर अल शामच नेतृत्व करतो. त्यांना HTS म्हणतात. HTS च्या जन्माची मूळ जबहात अल-नुसराच्या स्थापनेत आहे. 2011 साली ही दहशतवादी संघटना स्थापन झाली. सीरियामधील ही अल-कायदाची शाखा आहे. 2016 साली ते जबहात अल-नुसरापासून फुटून वेगळा गट हयात तहरीर अल शाम स्थापन झाला. बाशर अल-असाद यांना सत्तेवरुन हटवणं आणि सीरियात सुन्नी शासन प्रस्थापित करणं हा त्यांचा उद्देश होता.
सीरियामध्ये कोण-कोणासोबत?
सीरियन डेमोक्रॅटिक फोर्स हा दुसरा मोठा गट आहे. यामध्ये कुर्दीश फायटर्सचा समावेश होतो. त्यांना स्वायत्तता आणि कुर्दांचे अधिकार यासाठी ते लढत आहे. हा गट असाद यांना मोठा शत्रु मानत नाही. त्यानंतर टर्कीच समर्थन असलेली सीरियन नॅशनल आर्मी आहे. असाद आणि कुर्द दोघांना त्यांचा विरोध आहे. कारण कुर्दीश फायटर्सची टर्की विरोधात लढाई आहेत. ते बऱ्याच वर्षांपासून स्वत:साठी टर्कीकडे कुर्दीस्तानची मागणी करत आहेत.
असाद यांना कोणी दिली साथ?
जे दुसरे देश सीरियामध्ये गुंतले आहेत, त्यात इराण-रशिया आहे. त्यांचा असाद यांना पाठिंबा आहे. लेबनानमधील हिझबोल्लाह सुद्धा असाद यांचा समर्थक आहे. या तीन देशांनी बंडखोरांविरोधातील लढाईत असाद यांना पाठिंबा दिला. अमेरिका आणि टर्कीने असाद विरोधी गटांना बळ दिलं. असाद यांच्या सरकारच स्वतंत्र पॅलेस्टाइनला समर्थन होतं. त्यामुळे इस्रायलने सुद्धा अनेकदा सीरियामध्ये एअर स्ट्राईक केला.
आता काय झालं?
गाझा, लेबनान आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे इराण, हिझबोल्लाह आणि रशिया आपल्या व्यापात व्यस्त होते. त्यामुळे असाद यांना आवश्यक सपोर्ट मिळू शकला नाही. बंडखोरांनी हीच वेळ साध संपूर्ण सीरिया आपल्या ताब्यात घेतला. सीरियन लष्कराकडून सुद्धा त्यांना फार प्रतिकार झाला नाही.
गृहयुद्ध संपलं हे आत्ताच बोलणं घाईच ठरेल
असाद सत्तेवरुन गेले म्हणून सीरियातील गृहयुद्ध संपलं हे आत्ताच बोलणं घाईच ठरेल. कदाचित हा गृहयुद्धाचा पुढचा अध्याय असू शकतो. असाद हे सीरियामध्ये अजिबात लोकप्रिय नव्हते, सुन्नी मुस्लिम त्यांना आपलं विरोधक मानायचे. अल्पसंख्याकांच्या अधिकारासाठी ते आग्रही होते.
पेशाने डॉक्टर असलेल्या बाशर यांना राजकारणात का यावं लागलं?
बाशर अल-असाद हे राजकारणात अपघाताने आले. बाशर यांचा मोठा भाऊ बासिल हा हाफीझ अल-असाद यांचा राजकीय वारसदार होता. पण 1994 साली कार अपघातात त्यांचं निधन झालं. त्यामुळे बाशर यांना राजकारणात यावं लागलं. बाशर लंडनमध्ये नेत्ररोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत होते. बाशर यांनी 2000 साली सीरियाची सूत्र स्वीकारली. ते त्यांच्या वडिलांसारखा हुकूमशाही कारभार करणार नाहीत, असं अनेकांना वाटलं होतं. त्यांचं लंडनमध्ये जन्मलेल्या इन्वेसमेंट बँकर असमा सोबत लग्न झालं. त्यामुळे त्यांची उदारमतवादी अशी प्रतिमा तयार झाली. पण 2011 साली त्यांच्या शासनाविरुद्ध आंदोलन सुरु झाल्यानंतर त्यांचा खरा क्रूर चेहरा जगासमोर आला. त्यानंतर सर्व अपेक्षा संपुष्टात आल्या. सीरियामध्ये एक लढाई सुरु झाली.
भारताची भूमिका काय?
भारताचे सीरियातील बाशर सरकारसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. भारत-सीरियामध्ये नवी दिल्लीत 29 नोव्हेंबरला द्विपक्षीय चर्चा सुद्धा झाली होती. बाशर यांचं सत्तेवरुन जाण हे भारतासाठी नुकसानदायक आहे. कारण तिथे एखादा कट्टरपंथीय शासक सत्तेवर आला, तर भारताच्या बिझनेस हितांना धक्का लागू शकतो.