शेख हसीना यांना मोठा झटका, ब्रिटनकडे आश्रय मागितल्यावर पाहा काय दिलं उत्तर
बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले. हसीना यांनी ब्रिटनकडे आश्रय मागितल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत ब्रिटीश सरकार त्यांना राजकीय आश्रय देत नाही तोपर्यंत त्या भारतातच राहणार आहेत. पण ब्रिटनने काय उत्तर दिलेय जाणून घ्या.
विद्यार्थी आंदोलन तीव्र झाल्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. इतकंच नाही तर त्यांना देश देखील सोडावा लागला. सध्या शेख हसीना या भारतात सुरक्षित आहेत. पण त्यांना ब्रिटनमध्ये आश्रय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी ब्रिटन सरकारकडे परवानगी मागितली आहे. पण ब्रिटनच्या गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीला आश्रय किंवा तात्पुरता आश्रय घेण्यासाठी त्यांच्या देशात ब्रिटिश इमिग्रेशनचा असा कोणताही नियम नाही. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज आहे त्यांनी प्रथम सुरक्षित देशात आश्रय घ्यावा. सुरक्षिततेसाठी हा सर्वात जलद मार्ग आहे. औपचारिक आश्रय घेण्याच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु आहे.
ब्रिटीश सरकारने बांगलादेशातील हिंसक घटनांबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील चौकशीची मागणी केली आहे. ज्यामुळे त्यांनी शेख हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय घेण्यापूर्वी “काही काळासाठी” भारताला जाण्यास सांगितले. त्या सध्या भारतात सुरक्षित ठिकाणी आहेत.
ब्रिटनने काय म्हटले
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी सोमवारी बांगलादेशात गेल्या दोन आठवड्यांपासून झालेल्या हिंसाचार आणि जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीचा निषेध केला. ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये शांततापूर्ण आंदोलन सुनिश्चित करण्यासाठी ब्रिटन कृती करण्याचा प्रयत्न करत आहे. शेख हसीना यांनी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेतल्याच्या वृत्तावर सरकारने कोणतेही भाष्य केलेले नाही. गृह कार्यालयाच्या सूत्रांनी फक्त असे सूचित केले आहे की देशाचे इमिग्रेशन नियम विशेषत: व्यक्तींना आश्रय घेण्यासाठी ब्रिटनमध्ये जाण्याची परवानगी देत नाहीत.
ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर यांनी गेल्या महिन्यात मजूर पक्षाच्या दणदणीत विजयानंतर, आश्रय शोधणाऱ्यांनी “प्रथम सुरक्षित देशात” आश्रय घेतला पाहिजे, असे सांगितले होते. “यूकेकडे गरज असलेल्यांना संरक्षण प्रदान करण्याचा रेकॉर्ड आहे, आश्रय किंवा तात्पुरता आश्रय घेण्यासाठी कोणालाही यूकेमध्ये जाण्याची परवानगी देण्याची कोणतीही तरतूद नाही.