Rahul Gandhi: भारतातील परिस्थिती चांगली नाही, भाजपने सगळीकडे रॉकेल ओतलंय; राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi: आमची भाजपसोबत वैचारिक लढाई सुरू आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत आहे.
लंडन: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंब्रिज विद्यापीठातील आयडियाज फॉर इंडिया संमेलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसला (congress) पूर्वीसारखा भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. मात्र, आमचा आवाज दाबण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, असं सांगतानाच भारतातील परिस्थिती चांगली नाही. भाजपने चारही बाजूने रॉकेल ओतून ठेवलं आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच चीनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या आयडियाज फॉर संमेलनात सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा आणि मनोज झा आदी विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी झाले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष असून त्यातून आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुलीही राहुल गांधी यांनी दिली.
पूर्वीसारखाच भारत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच आमचा संघर्ष सुरू आहे. भाजप लोकांचा आवाज दाबत आहे. तर आम्ही लोकांचा आवाज ऐकण्याचं काम करत आहोत. देशाने ज्या संस्था निर्माण केल्यात त्यावरच हल्ला केला जात आहे. त्यावर डीप स्टेटचा ताबा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
I think it’s very dangerous for one company to control all airports, all ports, all the infrastructure. It (Private sector monopoly) has never existed in this form. It has never existed with such a massive concentration of power & capital: Rahul Gandhi in London on 20th May (1/2) pic.twitter.com/XvSzKoGQvl
— ANI (@ANI) May 21, 2022
काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह
आमची भाजपसोबत वैचारिक लढाई सुरू आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघ भारताला एक भूगोल म्हणून पाहत आहे. मात्र, काँग्रेससाठी भारत हा लोकांपासून तयार होतो, असं सांगतानाच अंतर्गत कलह, बंड, पक्षांतर आणि निवडणुकीतील पराभव आदी मुद्द्यांनी काँग्रेसला घेरलं आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.
ध्रुवीकरणामुळेच भाजप सत्तेत
भाजपच्या सत्ताकाळात रोजगार घटले आहेत. त्यानंतरही केवळ ध्रुवीकरणामुळे भाजप सत्तेत आहे. भारतात आज चांगली परिस्थिती नाही. भाजपने चोहोबाजूने रॉकेल ओतून ठेवलं आहे. जिथे वेगवेगळे विचार मांडले जाऊ शकतात. चर्चा होऊ शकते आणि संवाद साधला जाऊ शकतो, असा भारत आम्हाला निर्माण करायचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खासगी क्षेत्राचा एकाधिकार
एका कंपनीसाठीही सर्व विमानतळ, सर्व बंदरे, सर्व जुन्या गोष्टींना नियंत्रित करणं अधिक धोकादायक आहे. खासगी क्षेत्राचा एकाधिकार अशा प्रकारे कधीच अस्तित्वात आला नव्हता. सत्ता आणि भांडवलाचं केंद्रीकरणासह हे कधीच अस्तित्वात आलं नव्हतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.