‘माझ्या टॉयलेटमध्ये नेतन्याहू यांनी…’, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा इस्रायलच्या पीएमवर धक्कादायक आरोप
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या चर्चेत आहेत. इस्रायल एकाचवेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. या दरम्यान इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी धक्कादायक आरोप केला आहे.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. 2017 सालची ही घटना आहे. जॉनसन त्यावेळी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री होते. त्यानंतर 2019 ते 2022 दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान सुद्धा होते. द टेलीग्राफच्या रिपोर्ट्नुसार माजी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ‘अनलीश्ड’ या आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुस्तकाच्या ‘एक्सर्प्ट’ मध्ये या घटनेचा उल्लेख आहे. जॉनसन यांचं हे पुस्तक 10 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
रिपोर्टनुसार जॉनसन यांनी पुस्तकात वर्ष 2017 मधील इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबतच्या एका भेटीचा उल्लेख केलाय. जॉनसन यांनी लिहिलय की, या भेटी दरम्यान नेतन्याहू यांनी त्यांच्या घरच्या बाथरुमचा वापर केला. त्यानंतर त्यांच्या सिक्योरिटी टीमला बाथरुममध्ये एक मशीन मिळाली. त्यात बोललेल रेकॉर्ड व्हायचं.
‘नेतन्याहू यांनी बाथरुमला जायचं निमित्त केलं’
माजी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपल्या पुस्तकात नेतन्याहू यांचं उपनाव ‘बीबी’असा उल्लेख करुन लिहिलय. भेटीच्या निमित्ताने नेतन्याहू यांनी बाथरुमला जायचं निमित्त केलं. लंडनच्या पॉश क्लबमध्ये जसा एखादा व्यक्ती निमित्त बनवतो. सुरक्षा टीम जेव्हा माझ्या बाथरुमची सफाई करत होती, तेव्हा त्यांना तिथे आवाज ऐकणारी एक मशीन मिळाली. जॉनसन यांच्याकडे जेव्हा, पुस्तकातील एक्सर्प्ट बद्दल अधिक माहिती मागितली, तेव्हा त्यांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला. लोकांना जे काही जाणून घ्यायचय ते त्यांना पुस्तक वाचल्यानंतर समजेल असं ते म्हणाले.