स्पेशल रिपोर्ट: अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का?
ट्रम्प समर्थकांचा हा धुडगूस म्हणजे अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. त्याबाबतचा घेतलेला हा आढावा. (capitol building riots, civil war in the USA?)
वॉशिंग्टन: अमेरिकेन संसदेच्या परिसरात अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. कॅपिटल हिलवर झालेल्या या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प समर्थकांचा हा धुडगूस म्हणजे अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. त्याबाबतचा घेतलेला हा आढावा. (capitol building riots, civil war in the USA?)
कॅपिटल हिलचा इतिहास
वॉशिंग्टनला राजधानीचा दर्जा देण्यापूरमवी अमेरिकेन संसदेच्या काही सदस्यांनी फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्कसह इतर राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 4 मार्च 1789 रोजी अमेरिकेच्या संविधानाची सुरुवात झाली आणि अमेरिकन काँग्रेसची (संसद) स्थापना झाली. त्यानंतर 1790 पर्यंत न्यूयॉर्क हेच अमेरिकेच्या संसदेचं घर होतं. जेव्हा अमेरिका रेसिडेंस अॅक्ट मंजूर झाला तेव्हा अमेरिकाला कायमस्वरुपी राजधानी मिळाली. त्यानंतर अमेरिकेची संसद न्यूयॉर्कवरून वॉशिंग्टनला शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कॅपिटल हिलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रत्येक वर्षी त्यांचा स्टेट ऑफ द यूनियनचं भाषण करतात. याच ठिकाणीच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचं चेंबर असून त्याची सदस्य संख्या 448 आहे. कॅपिटल हिल बिल्डिंगच्या वेस्ट फ्रंटवरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दर चार वर्षानंतर 20 जानेवारी रोजी शपथ घेऊन आपला कार्यकाळ सुरू करतात.
संसदेला पेटवून दिलं होतं
सन 1800 मध्ये ही इमारत बनविण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चार वर्षात म्हणजे 1814 मध्ये या इमारतीला आग लावण्यात आली होती. 24 ऑगस्ट 1814 मध्ये ब्रिटीशांचे युद्ध सुरू होते. त्यावेळी या इमारतीला आग लावण्यात आली होती. त्यामुळे 1815 मध्ये या इमारतीची पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलं होतं. जॉर्ज बॉमफोर्ड आणि जोसेफ गार्डनर स्विफ्ट या दोन मिलिट्रीतील अभियंत्यांनी या इमारतीच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं होतं. त्यातच सिनेट आणि हाऊसचीही निर्मिती करण्यात आली होती.
संसदेवरील हल्ल्याचं कारण काय?
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून जो बायडेन नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. परंतु, ट्रम्प आपला पराभव मानण्यास तयार नाहीत. बायडेन यांनी निवडणुकीत घोळ घालून विजय मिळविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पराभव मान्य नसल्यामुळेच ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना वारंवार चिथावले होते. आज जो बायडेन यांना प्रमाणित करण्याची प्रक्रिया पार पडणार होती. म्हणजे बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होते. या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होऊ नये म्हणून या सोहळ्यापूर्वीच ट्रम्प समर्थकांनी संसद परिसरात घुसून धुडगूस घातला. काही आंदोलकांनी संसदेच्या उपाध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 57 आंदोलकांना अटक केली असून आंदोलकांकडून बंदुका जप्त केल्या आहेत.
अमेरिकेत संताप
कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यामुळे जनतेतून टोकाच्या प्रतिक्रिया उमटत असून त्यामुळे डोनाल्ड समर्थक आणि बायडेन समर्थक असे दोन गट अमेरिकेत निर्माण झाले असून आगामी काळात अमेरिकेत यादवी युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत.
वॉशिंग्टन डीसीतील रॅली, ट्रम्प यांचे भाषण यामुळे हल्ला?
काही दिवसांपूर्वीच वॉशिंग्टन डीसीमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांची रॅली आयोजित केली होती. यावेळी त्यांनी दीड तास भाषण केलं होतं. या भाषणातून त्यांनी त्यांच्या समर्थकांना सतत चिथावलं होतं. शिवाय ट्रम्प हे वारंवार ट्विट करून त्यांच्या समर्थकांना चिथावत होते. त्यानंतरच हा हल्ला झाला आहे, असं मिशिगन येथील ‘डेमोक्रेटिक पक्षा’चे भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.
रिपब्लिकन खासदारही नाराज
बायडेन यांनी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होते. या निवडीच्या ठरावावर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे खासदारही बोलणार होते. पण त्यांनी ऐनवेळी बोलण्यास नकार दिला. रिपब्लिकनच्या खासदारांनाही हा प्रकार आवडला नव्हता. संसद परिसरात हल्ला झाल्याने ही निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून रिपब्लिकन खासदारांनी ठरावावर भाषण केलं नाही. त्यामुळे एक प्रकारे बायडेन यांना फायदाच झाला, असं ठाणेदार म्हणाले.
ट्रम्प मार्केटर
हल्ल्याची संस्कृती अमेरिकेत ट्रम्प यांनीच आणली. ट्रम्प हे स्वत:च्या प्रेमात आहेत. इमेज राखण्यासाठी आणि ईगो जपण्यासाठी ते काहीही करतात. असा नेता पूर्वी अमेरिकेत कधीही झाला नाही. ते लोकशाहीतील नेत्यासारखे वागत नाहीत. ते हुकूमशहांसारखेच वागतता. ते मार्केटर आहेत. सेल्स आणि मार्केटिंगचं त्यांच्याकडे स्किल आहे. हे स्किल राजकारणापेक्षा वेगळं आहे. ते बिझनेसमधून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना मार्केटिंगची हौस असून हीच त्यांची खूबी आहे. म्हणूनच ते स्वत:ची मार्केटिंग करत असतात. पण अमेरिकेतील लोकांना ते मान्य नाही. शिवाय असा नेता परत नको, असंही रिपब्लिकनांना वाटतं, असं ठाणेदार यांनी सांगितलं. (capitol building riots, civil war in the USA?)
रिपब्लिकन पक्षातही यादवी?
ट्रम्प यांच्यासाठी पराभव ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांना विजय हवा असतो. त्यांना पराभव मान्यच नसतो. स्वत:ची इमेज वाचवण्यासाठीच त्यांनी निवडणूक पद्धतीतही खुसपट काढली. त्यांनी स्वत:च्या ईगोसाठी हे सर्व घडवून आणलं. रिपब्लिकन पक्षाचं नावही खराब केलं. आजच्या हल्ल्याने रिपब्लिकनपासून अमेरिकन दूर जाणार आहेत. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करणं हे रिपब्लिकनांसमोरचं आव्हान असेल. ते करताना त्यांना ट्रम्प यांना दूर ठेवावं लागेल. रिपब्लिकन ट्रम्प यांना नेता मानणार नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातही दोन गटात यादवी निर्माण होईल, असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.
संघर्षाची धार तीव्र होणार?
डेमोक्रॅटिक पक्षात अति डाव्या विचारांचे आणि गरीबांचा विचार करणारे असे दोन गट आहेत. आजच्या प्रकारामुळे डेमोक्रॅटिक पक्षातील डाव्या विचाराचे नेते रिपब्लिक नेत्यांना जवळ करणार नाहीत. त्यांना कोणतंही सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेच्या संसदेत संघर्षाची तीव्र ठिणगी पडताना दिसेल. डेमोक्रॅटिक पक्षाला दोन्ही सभागृहात बहुमत असलं तरी रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षातीलच डावे नेते यांच्यातील संघर्षाची धार तीव्र होणार असल्याचं बोललं जात आहे. (capitol building riots, civil war in the USA?)
अमेरिकेतील यादवीला सुरुवात?
आजचा प्रकार हा अमेरिकेतील अंतर्गत यादवीची सुरुवात असल्याचं काही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. ट्रम्प हे जिद्दी आहेत. आजच्या प्रकाराने जगासमोर त्यांची नाचक्की झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ते बायडेन यांना सुखासुखी राज्य करू देणार नाहीत. आपल्या समर्थकांना सतत चिथावणी देत ते अमेरिकेत आंदोलने घडवून आणतील. प्रत्येक पातळीवर बायडेन कसे कमकूवत ठरत आहेत, बायडेन यांचे निर्णय कसे चुकीचे आहेत आणि मी राष्ट्राध्यक्ष होणं किती महत्त्वाचं आहे हे ते अमेरिकनांवर ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न करतील. त्यामुळे देशात यादवी माजेल, असं जाणकार सांगतात.
अभासी प्रतिमेसाठीचा खेळ?
ट्रम्प यांच्या मनात एक वेगळी रिअॅलिटी असते. ते पारंपारिक आकडेवारी आणि निकाल मानत नाहीत. त्यांच्या मनात त्यांनी एक प्रतिमा तयार केलेली असते आणि तीच खरी आहे हे सांगण्याचं काम ते वारंवार करतात. बाहेरच्या जगात अभासी प्रतिमा निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांची इमेज जी निर्माण झाली आहे, हा त्याच अभासी प्रतिमेचा परिपाक आहे. आपण जिंकलेलो आहोत. बायडेन यांनी घोटाळा करून विजय मिळवला आहे, अशी अभासी प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच आज संसद परिसरात त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. याचा अर्थ जनतेलाही हा अभास पटला आहे. त्यामुळेच ट्रम्प पुढील काळात अशाच अभासी प्रतिमा करून अमेरिकेतील यादवीला खतपाणी घालतील असं राजकीय निरीक्षकांना वाटतंय. (capitol building riots, civil war in the USA?)
अमेरिकेत हिंसाचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा https://t.co/UA2F6K2pjl #DonaldTrump | #America | #AmericaCapitolAttack | #USCapitol | #Twitter
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
संबंधित बातम्या:
अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा
अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती जो बायडेन यांना किती पगार मिळणार? जाणून घ्या
(capitol building riots, civil war in the USA?)