जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती अन् त्यांच्या पत्नीसोबत डिनरची संधी, मोजावे लागतील ₹17 कोटी
Donald Trump Swearing Ceremony: अमेरिकेत शपथविधी समारंभासाठी या पद्धतीने देणगी घेणे ही सामान्य बाब आहे. यापूर्वी जो बियडेन यांच्या उद्घाटन समितीने 2021 मध्ये व्यक्तींकडून $500,000 आणि कॉर्पोरेशनकडून $1 दशलक्षपर्यंत देणग्या स्वीकारल्या होत्या. तसेच बराक ओबामा यांनी 2009 मध्ये त्यांच्या पहिल्या उद्घाटनासाठी $53 दशलक्ष जमा केले होते.
Donald Trump Swearing Ceremony: जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती आणि त्यांच्या पत्नीसोबत डिनर करण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. तुम्ही या संधीचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी 17 कोटी रुपये (2 मिलियन डॉलर) द्यावे लागणार आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्यासोबत डिनरची ही संधी आहे.
जाहिरात देऊन देगणीची मोहीम
द न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानुसार, ‘ट्रम्प वेंस इनॉगरल कमेटी बेनिफिट्स’ या मथळ्याखाली एक जाहिरात दिली आहे. त्यानुसार जो व्यक्ती 1 मिलियन डॉलर देणगी देईल किंवा 2 मिलियन डॉलर जमा करेल त्यांना 19 जानेवारी रोजी विशेष समारंभात जगातील सर्वात शक्तीशाली दाम्पत्यासोबत चालण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्या व्यक्तीला ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे सहा तिकीट मिळणार आहे. हा समारंभ 20 जानेवारी रोजी होणार आहे.
देणगीदारांना अन्य काही इतर फायदे देखील मिळणार आहेत. त्यांना ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील नामांकित व्यक्तींसोबत रिसेप्शन आणि उपाध्यक्ष-निर्वाचित सिनेटर जेडी व्हॅन्स आणि त्यांची पत्नी उषा यांच्यासोबत वेगळे डिनर यांचा समावेश आहे. $50,000 आणि $1 दशलक्ष दरम्यान योगदान देणाऱ्यांना उद्घाटनाच्या संध्याकाळी “स्टारलाइट बॉल” मध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.
अमेरिकेत शपथविधी समारंभासाठी या पद्धतीने देणगी घेणे ही सामान्य बाब आहे. यापूर्वी जो बियडेन यांच्या उद्घाटन समितीने 2021 मध्ये व्यक्तींकडून $500,000 आणि कॉर्पोरेशनकडून $1 दशलक्षपर्यंत देणग्या स्वीकारल्या होत्या. तसेच बराक ओबामा यांनी 2009 मध्ये त्यांच्या पहिल्या उद्घाटनासाठी $53 दशलक्ष जमा केले होते.
मेलानिया ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये राहणार
2024 मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत मेलानिया ट्रम्प निवडणूक अभियानात प्रसिद्धीपासून लांब होत्या. त्यांनी केवळ काही कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. त्या त्यांच्या पतीच्या दुसऱ्या कार्यकाळात लो प्रोफाइल असण्याची शक्यता आहे. त्या त्यांचा मुलगा बॅरन ट्रम्प शिकत असलेल्या न्यूयॉर्क शहरात राहणार असल्याचे म्हटले जात आहे.