India-China: चीनने अखेर आडमुठी भूमिका सोडली, लडाखमध्ये चिनी सैन्य मागे, भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत पत्रक जारी केले आहे, त्यात लिहिले आहे की- चीन-भारत कोअर कमांडर बैठकीच्या १६व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार, जियानान-डाबन क्षेत्रातील चिनी आणि भारतीय सैन्य नियोजित रित्या मागे सरकत आहे. यामुळे सीमेवर शांतासाठी अनुकूल स्थिती आहे.
बिजिंग – भारत (Indian Army)आणि चीनच्या सैन्यात लडाखमध्ये गे्ल्या काही काळापासून तणाव होता. आता हा तणाव निवळण्यास सुरुवात झालेली आहे. भारत आणि चीन (China)या दोन्ही देशांच्या सैन्याची या भागातून पिछेहाट होण्यास सुरुवात झालेली आहे. चीनने याबाबत म्हटले आहे की, सैन्यदलांचे मागे हटणे, हे भारत-चीन सीमेवर शांतीसाठी चांगले आहे. दोन्ही देशांनी उचललेल्या या पावलांमुळे या परिसरात असलेला तणावही निवळण्याची शक्यता आहे. भारत आणि चीनमध्ये कमांडर लेव्हलवर (commander level)झालेल्या १६ व्या चर्चेत हा तोडगा निघाला असण्याची शक्यता आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने ही पिछेहाट या चर्चेशी जोडली आहे. ही चर्चा दोन्ही देशांमध्ये जुलैत चुशुल-माल्डो मिटिंग पाँइंटवर झाली होती.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत पत्रक जारी केले आहे, त्यात लिहिले आहे की- चीन-भारत कोअर कमांडर बैठकीच्या १६व्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार, जियानान-डाबन क्षेत्रातील चिनी आणि भारतीय सैन्य नियोजित रित्या मागे सरकत आहे. यामुळे सीमेवर शांतासाठी अनुकूल स्थिती आहे. चीनच्या पत्रकात ज्याचा उल्लेख जियानान-डाबन असे करण्यात आला आहे, त्याला भारतीय सैन्यदलाने जारी केलेल्या पत्रकात गोगरा-हॉटस्प्रिंग असे संबोधण्यात आले आहे.
चार महिन्यांनंतर झाली होती चर्चा
चार महिन्यांच्या अंतरानंतर जुलैत दोन्ही सैन्यदलात १६ व्या चर्चेची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते. त्यात लिहिले होते की- दोन्ही देशांकडून पश्चिमी क्षेत्रात जमिनीवर सुरक्षा आणि स्थिरता निर्माण व्हावी, यासाठी सहमती झाली आहे.
शांघाई सहयोग संघटनेच्या शिखर संमेलनापूर्वी पिछेहाट
अझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाई सहयोग संघटनेच्या शिखर संमलेनापूर्वी एक आठवडा दोन्ही देशांनी हे पाऊल उचलले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सहभागी होणार आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही नेत्यांत द्विपक्षीय बैठक होणार आहे का, याची अद्याप माहिती नाही. मात्र आता सैन्यदलाच्या पिछेहाटीनंतर दोन्ही नेत्यांत चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे.