China Lockdown | चीनमध्ये पुन्हा कठोर लॉकडाऊन, नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली
चीनच्या वुहान शहरात 2019 च्या अखेरीस पहिला कोव्हिड रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रारंभापासूनच चीनने कठोर चाचणी, लॉकडाऊन, विलगीकरण आणि मास्कची सक्ती यासारखी बंधनं लादली आहेत.
बीजिंग : कोव्हिड-19 च्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनने बुधवारी त्याच्या पूर्व किनारपट्टीवरील शहरांमध्ये लॉकडाऊन अधिक कठोर (China Lockdown) केला. त्याचप्रमाणे कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे आदेशही दिले आहेत. फुजियान प्रांतातील (Fujian) पुतियन शहराभोवती (Putian) टोल स्थानकांवर तपासणी सुरू करण्यात आली आहे.
पुतियन शहराच्या जवळच्या झियामेन आणि क्वानझोऊ शहरांनीही प्रवास प्रतिबंधित केला आहे. कारण डेल्टा व्हेरिएंट (Corona Delta Variant) या प्रदेशात पसरताना दिसत आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने बुधवारी सांगितले की फुजियानच्या विविध भागांमध्ये आणखी 50 रुग्णांचे निदान झाले आहे, त्यापैकी बहुतेक पुतियन प्रदेशातील आहेत.
चीनच्या वुहान शहरात 2019 च्या अखेरीस पहिला कोव्हिड रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रारंभापासूनच चीनने कठोर चाचणी, लॉकडाऊन, विलगीकरण आणि मास्कची सक्ती यासारखी बंधनं लादली आहेत.
फुजियानमध्ये स्टे अॅट होम आदेश
फुजियानमध्ये अलिकडच्या काळात किमान 152 नवीन केसेस आढळल्या आहेत, ज्यामुळे नागरिकांना घरी राहण्याचे आदेश (Stay at Home) देण्यात आले आहेत. मनोरंजन, रेस्टॉरंट आणि फिटनेस केंद्र बंद करणे, तसेच आगामी शारदीय महोत्सवाच्या (Mid-Autumn Festival) सुट्टीत ग्रुप अॅक्टिव्हिटी रद्द करणे, यासारखे निर्बंध समाविष्ट आहेत. प्रांताच्या इतर भागांसाठी लांब पल्ल्याची बस सेवा निलंबित करण्यात आली आहे.
अधिक संसर्गजन्य व्हेरिएंटबद्दल चिंता
चीनने कोव्हिड19 चा प्रसार मोठ्या प्रमाणात थांबवला आहे परंतु देशाच्या विविध भागांमध्ये नव्याने उद्रेक होताना पाहायला मिळत आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक अनेक प्रांतांमध्ये पसरला, त्यामुळे नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंटबद्दल चिंता वाढत आहे.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे म्हणणे आहे की त्यांनी लसीचे 2 अब्जाहून अधिक डोस दिले आहेत, जरी स्थानिक पातळीवर विकसित झालेल्या लसींची कार्यक्षमता, विशेषतः डेल्टा व्हेरिएंटबाबत साशंकता निर्माण करणारी आहे.
लॉकडाऊन आणि इतर कठोर उपायांनी अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनावर परिणाम केला आहे, तरी बहुतेक देशांनी सुरुवातीच्या उद्रेकाच्या परिणामांवर मात केली आहे.
संबंधित बातम्या :
Nagpur Lockdown | नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर? नितीन राऊतांचं मोठं वक्तव्य