सुदानमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरुच, आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू
युद्धबंदी करारानंतरही सुदानमधील रक्तरंजित संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बाजारपेठा आणि बँका लुटल्या जात आहेत. अनेकांना घरांमध्ये कैद राहावे लागत आहे.
मुंबई : आफ्रिकन देश सुदानमधील रक्तरंजित संघर्ष तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. 15 एप्रिलपासून लष्कर आणि निमलष्करी पॅरा मिलिट्री फोर्समध्ये युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 500 लोकं या लढ्याचे बळी ठरले आहेत. पण हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. सतत गोळीबार सुरु आहे. क्षेपणास्त्र डागले जात आहे. इमारती कोसळत आहेत.
आरएसएफचे नेते जनरल मोहम्मद हमदान डगलो यांनी म्हटले की, जोपर्यंत संघर्ष सुरू आहे तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही. आपल्या लढवय्यांवर सातत्याने भडिमार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, अनेकांनी युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याचीही बातमी आहे, मात्र असे असूनही युद्ध थांबताना दिसत नाही.
3 हजार भारतीयांना बाहेर काढण्यात यश
हिंसक मारामारीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हजारो लोक जीव वाचवण्यासाठी पळून गेले आहेत. याशिवाय अन्न, पाणी आणि वीज नसल्याने अनेकांना घरात कैद राहावे लागत आहे. ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमधून सुमारे 3 हजार भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
ज्या भागात हिंसाचार पसरला आहे, त्यामध्ये राजधानी खार्तूमशिवाय दारफुरचाही समावेश आहे. जिनानी येथे झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात बाजारपेठा, गोदामे आणि बँका लुटण्यात आल्या. परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. लोकं सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हजारो लोकं सुदानीज चाड, इजिप्त आणि दक्षिण सुदान यांसारख्या शेजारच्या देशांमध्ये गेले आहेत.
युद्धबंदी करार होऊनही हिंसाचार
याआधी गुरुवारी रात्री उशिरा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी ७२ तासांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली होती, मात्र तरीही हिंसाचार सुरूच आहे. हा युद्धविराम करार अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या मदतीने करण्यात आला.