सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय, अनेक देश पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत
मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनानं जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे (Corona increase in world).
मुंबई : मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनानं जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वाधिक बाधित झालेला इटली देश आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत रुग्णसंख्या शंभराच्या पलीकडेही जात नव्हती. पण, आता त्याच इटलीत गुरुवारी (29 ऑक्टोबर) एका दिवसात 26,831 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे (Corona increase in world).
दुसरीकडे फ्रान्समध्येही कोरोनाने कहर घातल्याने आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता, पंतप्रधान अँजले मार्केल यांनी देशात 2 नोव्हेंबरपासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे (Corona increase in world ).
केवळ फ्रान्स किंवा इटलीच नव्हे तर, अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरु असल्याचं दिसत आहे. अमेरिका देशात सर्वाधिक 91 लाख 75 हजार 336 कोरोनाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 59 लाख 54 हजार 907 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 लाख 33 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिका पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. भारतात आतापर्यंत 80 लाख 87 हजार 494 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 1 लाख 21 हजार 120 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझील देशात 49 लाख 34 हजार 548 रुग्ण आढळले आहेत. तर रशियात आतापर्यंत 11 लाख 86 हजार 41 रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या जागतिक साथीच्या दुसऱ्या लाटेत केवळ जर्मनीच नाही तर युरोपातील स्पेन आणि फ्रान्स या दोन प्रमुख देशांनी निर्बंध लागू केले आहेत. स्पेनने सहा महिन्यांसाठी रात्रीची संचारबंदी यापूर्वीच लागू केली आहे. तर फ्रान्सने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे भारतानेही वेळीच धोका ओळखून काळजी घेण्याची गरज आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या सुरक्षित लसीच्या प्रतिक्षेत आहे. त्याचवेळी आता हिवाळ्यात कोरोनासह फ्लूसारखे अन्य आजार पसरण्याचा धोका वाढतोय. त्यामुळे अनेक तज्ज्ञांकडून कोरोनाची लस उपलब्ध होईपर्यंत फ्लू या आजाराची लस देण्याचा सल्ला दिला जातोय.
नेदरलँडच्या रेडबाऊंड युनिव्हर्सिटीतील एका संशोधनात वैज्ञानिकांनी फ्लूची लस कोरोना व्हायरसपासून बचावसाठी परिणामकारक असल्याचं म्हटलं आहे.
मेडिकल सेंटरच्या इम्यूनेलॉजिस्ट मिहाई नेटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2020 या वर्षाच्या हिवाळ्याच्या वातावरणात फ्लूची लस देण्यात आली होती. त्यांच्यावर कोरोनाचा होणारा प्रभाव याचा अभ्यास करण्यात आला होता. या संशोधनातून समोर आलं की, ज्या लोकांना फ्लू ची लस देण्यात आली त्यांच्यात कोरोना संक्रमणाचा धोका 39 टक्क्यांनी कमी झाला होता.
हिवाळ्यात कोरोना आणि फ्लू या दोघांच्या विषाणूजन्य संक्रमणाचा धोका वाढू शकतो. कोल्ड इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी फ्लूची लस फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे वाढता कोरोनाचा धोका पाहता, आता ऐन हिवाळ्यात फ्लूच्या लसीचाही खरंच फायदा मिळतो का? याचीही चाचपणी सुरु झाली आहे. एकंदरीतच कोरोनाची लस येईपर्यंत सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.