आकाशात दिसणार दिवाळी, दोन दिवस ताऱ्यांचा पडणार पाऊस, प्रत्येक तासाला पडणार 1000 उल्कापिंड
या उल्कापिडांचा पाऊस एका धूमकेतूमुळे होणार असल्याचेही नासाने स्पष्ट केले आहे. नेमका का पडणार आहे हा पाऊस, यामागची शास्त्रीय कारणे काय, भारतातून हे दिसणार का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न
वॉशिंग्टन – जगभरातील अंतराळ प्रेमींसाठी (Space lovers)आनंदाची बातमी आहे. पुढचे दोन दिवस आकाशात ताऱ्यांचा (rain of stars)पाऊस होणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, ३० आणि ३१ मे रोजी ताऊ हरक्युलिल्ड उल्कापिंडांचा पाऊस (Meteor showers)पृथ्वीवर पडणार आहे. गेल्या २० वर्षांनंतर पहिल्यांदाच उल्कापिडांची चमक आकाशात दिसण्याची शक्यता आहे. या उल्कापिडांचा पाऊस एका धूमकेतूमुळे होणार असल्याचेही नासाने स्पष्ट केले आहे. नेमका का पडणार आहे हा पाऊस, यामागची शास्त्रीय कारणे काय, भारतातून हे दिसणार का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न
का पडणार उल्कापिडांचा पाऊस?
धूमकेतू हा बर्फ आणि धुळीपासून तयार होतो, त्याचा आकार शेपटीसारखा असतो. सूर्याभोवती धूमकेतूचे भ्रमण सुरु असते. जेव्हा धूमकेतू पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी जवळ येतो, तेव्हा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे धूमकेतूच्या तुकड्यांना पृथ्वीकडे खेचण्यास सुरुवात करते. जेव्हा हे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात येतात तेव्हा त्यांना आग लागते, अशा वेळी आकाशात मोठा प्रकाश पाहायला मिळतो.
On Monday night into Tuesday morning, the Earth may cross paths with the remnants of comet 73P/Schwassmann-Wachmann (SW3), a defunct comet that broke apart in 1995: https://t.co/eOsb2CQ92K
— Breaking Weather by AccuWeather (@breakingweather) May 29, 2022
काय आहे या धूमकेतूचा इतिहास?
ही उल्कापिंड एसड्ब्ल्यू ३ धूमकेतुतून निघून पृथ्वीकडे येणार आहेत. या धुमकेतूचा शोध काही वर्षांपूर्वी दोन जर्मन खगोलशास्त्रज्ञांनी लावला होता. त्यांच्याच नावावरुन या धूमकेतूचे नाव ठेवण्यात आले होते. हा धूमकेतू साधारण ५.४ वर्षात एकदासूर्याला फेरी मारतो. गेल्या ४० वर्षांत हा धूमकेतू रहस्यमय रित्या गायब झाला होता. १९३५ ते १९७४ या काळात या धूमकेतूला किमान ८ वेळा पाहिले गेले होते. त्यानंतर मार्च १९७९ आणि १९९५ साली या धूमकेतूचे दर्शन झाले होते. त्यावेळी तो गेल्या वेळीपेक्षा ६०० पट प्रकाशमान होता.
भारतातून उल्कापिंडांचा पाऊस दिसणार का?
हा धूमकेतू आता अनेक भागात विभागला गेलेला आहे. ३१ मे च्या रात्री प्रत्येक तासाला १ हजार उल्कापिंडांचा पाऊस होईल असे नासाने सांगितले आहे. मात्र जर धूमकेतूतील धूळ वेगळी होण्याची गती कमी झाली असेल तर उल्कापिडांचा पाऊस होणार नाही. नासाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास उल्कापिंड पृथ्वीकडे गतीने येताना दिसतील. भारतात तेव्हा दिवस असल्याने अंतराळप्रेमींना हा वर्षाव पाहता येणार नाही, हे दुर्दैव. मात्र अनेक ठिकाणांहून यू ट्यूबवर याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे ते आपण सोशल मीडियावर पाहू शकणार आहोत. अमेरिका, कॅनडा, मैक्सिको आणि लॅटिन अमेरिकेत ही पर्वणी पाहता येणार आहे.