डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निशाण्यावर? सभेच्या ठिकाणी आढळली शस्त्रास्त्र , एकाला अटक
मिलवॉकी येथे झालेल्या नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनदरम्यान एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडे AK-47 रायफल आढळली आहे.
Donald Trump Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर सभेत गोळीबाराची घटना घडली. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया या ठिकाणी 13 जुलैला संध्याकाळच्या सुमारात ही घटना घडली. या घटनेनंतर अमेरिकेतील नागरिकांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यानंतर आता मिलवॉकी येथे झालेल्या नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनदरम्यान एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडे AK-47 रायफल आढळली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे ठिकठिकाणी फिरत आहेत. आता नुकतंच मिलवॉकी येथे नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली.
AK-47 रायफल आणि गोळ्या आढळल्या
पण या कन्व्हेशनदरम्यान दोन धक्कादायक घटना समोर आल्या. यावेळी पोलिसांनी कार्यक्रम आयोजित केलेल्या ठिकाणावरुन एका 21 वर्षीय तरुणाला अटक केली. हा व्यक्ती या कन्व्हेंशनमध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. त्यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला रोखले. या तरुणाने तोंडावर मास्क लावला होता. त्यासोबतच त्याच्याकडे एक मोठी बॅगही होती. यामुळे पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या बॅगेत AK-47 रायफल आणि गोळ्या आढळल्या आहेत.
चाकू घेऊन गस्त घालत असलेल्या एकाची हत्या
तसेच पोलिसांनी याच ठिकाणी एका संशयिताची हत्या केल्याचेही समोर आले आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती पोलिसांना दिसली. यावेळी त्याच्या हातात चाकूही होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला चाकू फेकण्यास सांगितले. मात्र त्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
तिसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 2016 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. तेव्हा ते विजयी झाले होते. तर मागील निवडणुकीत 2020 मध्ये ते पराभूत झाले. त्यानतंर आता पुन्हा ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.