महासत्ता अमेरिकेचा इराणला दम, हुथींच्या हल्ल्यांमागे इराणची फूस ?
अमेरिकेने थेट इराणला दम दिला आहे. अमेरिकेच्या जहाजावर हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरण्याची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. हुथींची प्रत्येक गोळी इराणचा हल्ला मानली जाईल आणि त्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. येमेनमध्येही अमेरिकन सैन्याने हल्ले केले आहेत.

गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले करून हुथींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पण, आता अमेरिकेनं थेट हुथींच्या हल्ल्यावरुन इराणलाच धमकी दिली आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांच्या कोणत्याही हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोमवारी इराणला ही धमकी दिली आहे. अमेरिकेने येमेनमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर आणि हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात प्रत्युत्तर दिल्यानंतर ट्रम्प यांनी ही धमकी दिली.
हमासला पाठिंबा देण्यासाठी लाल समुद्रातून जाणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांवर हुथींनी वारंवार हल्ले केले आहेत. या गटाला इराणकडून मदत मिळत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
अमेरिकेने गेल्या आठवड्यात येमेनमध्ये जोरदार हवाई हल्ले केले असून ते हुथींना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर लाल समुद्रातही हुथींनी अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला चढवला आहे. हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांच्या लढाऊ विमानांनी 24 तासांत दोनदा अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस हॅरी ट्रूमन आणि त्याच्या सोबतच्या युद्धनौकांना लक्ष्य केले. यानंतर ट्रम्प यांची नवी धमकी आली असून, त्यात इराणलाही इशारा देण्यात आला आहे.




‘इराणला जबाबदार धरले जाईल’ हुथींनी झाडलेल्या प्रत्येक गोळीला इराण जबाबदार असेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “हुथींनी झाडलेली प्रत्येक गोळी इराणच्या शस्त्रास्त्रे आणि नेतृत्वातून मारलेली मानली जाईल.” इराणला जबाबदार धरले जाईल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील.
ट्रम्प म्हणाले की, इराण दहशतवादी गटांना पाठिंबा देतो आणि त्यांच्यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही. हुथींच्या कोणत्याही हल्ल्याला ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. याचे उत्तर केवळ हुथी लोकांपुरतेच मर्यादित असावे, असे नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अमेरिकेने येमेनवर हल्ला केल्यास आपला गट लाल समुद्रातील अमेरिकी लष्करी जहाजांनाही लक्ष्य करेल, असे हुथी नेते अब्दुल मलिक यांनी म्हटले आहे.
लाल समुद्रातील मार्ग अमेरिकेसाठी कठीण
गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले करून हुथींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इस्रायल, अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या जहाजांना हुथींनी लक्ष्य केले आहे. यामुळे जगातील सर्वात व्यस्त शिपिंग मार्गांपैकी एक युद्धक्षेत्रात रूपांतरित झाला आहे. यामुळे अमेरिकन जहाजांना मार्ग बदलावा लागला आहे. आता हुथींनी अमेरिकेच्या लष्करी जहाजांवरही हल्ले केले आहेत.