डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने इस्रायलमध्ये सेलिब्रेनश, इस्रायली लोकं का झाले खूश?
जगात सध्या चार देशांमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. पण यातून अजून कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. दुसरीकडे इस्रायल याचे हमास आणि हिजबुल्लाह यांच्यासोबत युद्ध सुरु असून इराण देखील यात पडला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने इस्रायली लोकं का खूश आहेत जाणून घ्या.
Israel America Relation: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत विजय मिळवून अनेकांना धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केलाय. आपल्या पहिल्या भाषणात बोलताना ट्रम्प यांनी हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल असं म्हटले आहे. अभूतपूर्व जनादेश दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र ट्रम्प यांच्या विजयाने जगभरात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांच्या विजयाने इस्रायलमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. इस्रायलमधील टीव्ही चॅनेल्सवर देखील विजयाचा जल्लोष केला जात आहे. ट्रम्प यांचा विजय केवळ अमेरिकन लोकांसाठीच नाही, तर इस्रायलसाठीही महत्त्वाचा असल्याचे इस्रायली प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संबंध खूप घट्ट झाले होते. ट्रम्प यांनी इस्रायलसाठी अनेक मोठे निर्णय देखील घेतले होते. ज्यात जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देणे, अमेरिकन दूतावास तेथे हलवणे यांचा समावेश होता. इस्रायलच्या सुरक्षेबाबतही त्यांनी अनेक वेळा समर्थन दिले. अशा स्थितीत इस्त्रायली जनता आणि तिथली प्रसारमाध्यमे ट्रम्प यांची ही नवी टर्म त्यांच्यासाठीही सकारात्मक ठरेल अशी आशा आहे.
ट्रम्प यांनी पहिल्या भाषणात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे ज्यात त्यांनी पुन्हा युद्ध होऊ देणार नाही असे म्हटले आहे. सुरु असलेले युद्ध संपवण्याचा आपला प्रयत्न असेल असे ही ते म्हणाले. इस्रायल आणि युक्रेन युद्धाबाबत त्यांनी इशारा दिला आहे. “आम्ही आणखी युद्ध होऊ देणार नाही. असं त्यांनी म्हटल्याने युद्धग्रस्त भागात शांतता प्रस्थापित होण्याच्या आशा वाढल्या आहेत.
या निवडणूक निकालाचा परिणाम अमेरिकेवरच नाही तर जागतिक पातळीवरही होणार आहे. परंतु रशिया-युक्रेन आणि गाझा यांसारख्या ज्या भागात इस्रायलचाही समावेश आहे, त्या भागात काही हालचाली नक्कीच होतील.
God bless America and Long live Israel’: this is how Israeli TV is celebrating Trump’s victory on air pic.twitter.com/GcnvbK4IIz
— 𝕏 𝐁𝐫𝐞𝐚𝐤𝐢𝐧𝐠 𝐍𝐞𝐰𝐬 (@cheguwera) November 6, 2024
इस्रायलचे हमास आणि हिजबुल्लाह या दोन दहशतवादी संघटनेच्या विरोधात युद्ध सुरु आहे. यासोबतच इराण आणि इस्रायलमध्ये देखील तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने या दोन्ही संघटनांना संपवण्यासाठी कारवाई सुरुच ठेवली आहे. आतापर्यंत दोन्ही संघटनेच्या प्रमुखांना मारण्यात त्यांना यश देखील आले आहे.
दुसरं युद्ध आहे ते युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये. गेल्या अनेक महिन्यांपासून हे युद्ध सुरु आहे. रशियाची ताकद जास्त असल्याने युक्रेनचं आतापर्यंत मोठं नुकसान झाले आहे. अनेक देशांनी शांततेचं आवाहन करुनही अजूनही मार्ग निघालेला नाही. त्यामुळे आता ट्रम्प काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.