तेहरानचा कसाई… ईराणी राष्ट्रपतीच्या मृत्यूनंतर इस्रायली मीडियात धक्कादायक प्रतिक्रिया
ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि गव्हर्नर यांचाही मृत्यू झाला आहे. रईसी यांच्या मृत्यूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. रईसी यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रईसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. पण फक्त रईसी यांच्याच हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि गव्हर्नरचाही मृत्यू झाला आहे. ईराणच्या सरकारी मीडियाने या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. हवामान खराब असल्याने हा अपघात झाला असावा असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ईराणवर आकाश कोसळलं आहे. ईराणच्या भविष्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, ईराणने काही दिवसांपूर्वी ज्यांच्यावर हवाई हल्ला केला होता, त्या देशाची म्हणजे इस्रायलची मीडियामधून रईसी यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केलं जात आहेत.
द टाइम्स ऑफ इस्रायल या इस्रायलच्या एका बड्या वृत्तपत्राने रईसी यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती बनण्याआधी याच रईसी यांनी ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या आधीन असलेल्या न्यायपालिकेत विविध पदावर काम केलं होतं. 1988च्या ईराण-इराक युद्धाच्या शेवटी हजारो राजकीय कैद्यांना त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. हजारो लोकांना मारल्यानंतर त्यांना तेहरानचा कसाई म्हटलं गेलं, असं या वृत्तपत्रात म्हटलं आहे.
युद्धावर परिणाम होणार नाही
तर, दोन देशात संघर्ष सुरू असतानाच ईराणच्या राष्ट्रपतींचा आणि मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. अशा घटनांमुळे युद्धावर काही परिणाम होणार नाही. कारण परराष्ट्र धोरण आणि युद्धाबाबतचे निर्णय ईराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई घेत आहेत, असं टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलं आहे. वारंवार झटके बसत असल्याने ईराणची सत्ता कमकुवत होताना दिसत आहे. काही महिन्यांपासून तेहरान कमकुवत होताना दिसत आहे. 3 जानेवारी रोजी ईराणच्या दहशतवाद्यांनी ईराणच्या एलिट कुद्स फोर्सचे पूर्व प्रमुख जनरल कासिम सोलेमानी यांच्या कबरीजवळ कमीत कमी 84 लोकांना बॉम्बने उडवलं आहे. या लोकांना ड्रोन हल्ल्यात मारण्यात आलं. सोलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्ताने ते कब्रस्तानात आले होते. गेल्या महिन्यात सुन्नी दहशतवादी गट जैश अल अद्लने 11 ईराणी पोलिसांची हत्या केली होती, असं या वृत्तपत्रात म्हटलं आहे.
सत्ता बदल होणार नाही
द जेरुसलम पोस्टनेही एक विश्लेषणात्मक लेख छापला आहे. रईसी यांच्या मृत्यूने ईराणच्या देशांतर्गत राजकारणावर परिणाम होईल. मात्र, सत्ता बदल होणार नाही, असं द जेरुसलम पोस्टने म्हटलं आहे. रईसी यांच्या मृत्यूनंतर ईराणच्या दुश्मनीवर काही परिणाम होणार नाही. ईराण हमास आणि हिजबुल्लाह सारख्या गटांना पाठिंबा देणं थांबवणार नाही. सध्या त्यांचं युद्ध इस्रायलसोबत आहे. रईसी यांच्या मृत्यूमुळे अण्वस्त्र बनवण्याच्या प्रकल्पावरही काही परिणाम होणार नाही, असं या वृत्तपत्रात म्हटलं आहे.