Elon Musk : भारत-कॅनडा संघर्षात एलॉन मस्क कोट्यवधी भारतीयांच्या मनातलं बोलले, ट्रूडोंसाठी धोक्याची घंटा
Elon Musk : मागच्यावर्षी कॅनडाच्या संसदेत बोलताना जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. यानंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणाव वाढला. मागच्यावर्षी कॅनडाच्या सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. दोन्ही देशांचे संबंध चिघळण्याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो जबाबदार आहेत. मतांच्या राजकारणासाठी ते भारतविरोधी खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालत आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन त्यांनी भारतावर तथ्यहीन आरोप केले. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. आता टेस्लाचे सीईओ आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी जस्टिन ट्रूडो यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मस्क यांनी जस्टिन ट्रूडोच्या राजकीय करिअरवर भाष्य केलं आहे. ‘कॅनडामध्ये पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत ट्रूडो यांना निरोप निश्चित आहे’ असं मस्क यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीने मस्क यांच्याकडे मदत मागितली. ट्रूडोपासून मला सुटका करायची आहे, मला मदत करा असं त्या व्यक्तीने सांगितलं.
जर्मनीतून समाजवादी सरकार गेल्यानंतर या व्यक्तीने कॅनडातून ट्रूडोंपासून पाठलाग सोडवण्यासाठी मस्क यांच्याकडे मदत मागितली. त्यावर मस्क यांनी हे म्हटलय. कॅनडामध्ये पुढच्यावर्षी निवडणुका होणार आहेत. सध्या अल्पमताच सरकार चालवणाऱ्या ट्रूडो यांच्यावरील दबाव वाढत चालला आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित मानला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय असलेल्या मस्क यांनी अशी टिप्पणी करणं अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार संभाळल्यानंतर त्यांच्या भावी योजना काय असतील? त्याचे संकेत यातून मिळतात.
He will be gone in the upcoming election
— Elon Musk (@elonmusk) November 7, 2024
कोण होता हरदीप सिंह निज्जर?
मागच्यावर्षी कॅनडाच्या संसदेत बोलताना जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. यानंतर भारत आणि कॅनडामधील राजनैतिक तणाव वाढला. मागच्यावर्षी कॅनडाच्या सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जरची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर खलिस्तानी दहशतवादी होता. खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. अनेक वर्षांपासून तो कॅनडात रहायला होता. भारताविरुद्ध कारवाया करण्यामध्ये सक्रीय होता.