Anju Nasrullah News | निकाह झाला की नाही?, अंजू हिचा यूटर्न; म्हणाली, सर्व फेक आहे…
मी आरामात भारतात येईल. मी इथे येऊन काही गुन्हा केलेला नाही. सर्व लोक फिरायला येतात. पर्यटक कराची आणि लाहोर फिरायला येतात. तशीच मीही आले आहे. मी काही गुन्हा केलेला नाहीये.
कराची | 30 जुलै 2023 : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूला पाकिस्तानातून महागडे गिफ्ट्स मिळत आहेत. अंजूने इस्लामचा स्वीकार केल्याने एका कथित उद्योजकाने तिला 40 लाखाचा फ्लॅट आणि चेकद्वारे मोठी रक्कम दिली आहे. त्यामुळे अंजू आणि नसरुल्लाह यांचा निकाह झाल्यावर शिक्कामोर्तब झाला होता. तिने निकाह करून इस्लाम धर्म स्वीकारल्यानेच तिला ही भेट मिळाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अंजूने पुन्हा एकदा घुमजाव केलं आहे. आपण निकाह केलाच नसल्याचा दावा अंजू हिने केला आहे.
अंजूने पाकिस्तानातून थेट टीव्ही9 भारतवर्षशी संवाद साधला. यावेळी तिने निकाहचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच महागड्या गिफ्ट्सबाबतही भाष्य केलं आहे. माझी मुलगी घाबरलेली आहे. सर्वच त्रस्त झाले आहेत. माझं तिच्याशी बोलणं होत नाहीये. मीडिया जे काही दाखवत आहे, तसं काहीच नाहीये. निकाह केल्याचं वृत्त फेक आहे. मात्र, हे सर्व पाहून माझे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. माझ्याशी तेही बोलत नाहीये. माझी मुलं घाबरलेली आहेत. त्यामुळेच त्यांच्याशी माझं बोलणं होत नाहीये, असं अंजू म्हणाली.
यावेळी अंजू भावूक झाली. मी त्यांच्यावर किती प्रेम करते हे माझ्या मुलांना कुणी तरी सांगा. एंजल (अंजूची मुलगी) पर्यंत माझं म्हणणं कुणी तरी पोहोचवा. मी तिच्यावर खूप प्रेम करतोय हे तिला कुणी तरी समजवा, असं अंजूने सांगितलं.
म्हणून गिफ्ट्स मिळाले
यावेळी तिने गिफ्ट्स आणि फ्लॅट्सबाबतही खुलासा केला. मला भेटवस्तू मिळाल्या आहेत. पठाण लोक पाहुण्यांचं प्रचंड स्वागत करत असतात. त्यांचा आदर सत्कार करत असतात. म्हणून या भेटवस्तू त्यांच्याकडून मिळाल्या आहेत. बाकी दुसरं काही नाही. जसं दाखवलं जात आहे, तसं काहीच नाही, असा दावाही तिने केला.
आरामात भारतात येईल
मी पाकिस्तानात केवळ एका आठवड्यासाठी आले होते. मात्र, परिस्थिती अशी झाली की अजूनपर्यंत मला इथे थांबावे लागले. मी इथे व्यवस्थित आहे. मला काहीच अडचण नाहीये. माझा व्हिसा आहे. मी आरामात भारतात येईल. मी इथे येऊन काही गुन्हा केलेला नाही. सर्व लोक फिरायला येतात. पर्यटक कराची आणि लाहोर फिरायला येतात. तशीच मीही आले आहे. मी काही गुन्हा केलेला नाहीये, असंही तिचं म्हणणं आहे.