भारतात राहत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ
आधी पंतप्रधानपद आणि नंतर देश सोडावा लागलेल्या शेख हसीना यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शेख हसीना यांना पुन्हा देशात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे असं नव्या सरकारमधील सल्लागारांनी म्हटले होते. पण असं असतानाच त्यांच्या अडचणी वाढत आहेत.
देशातील हिंसक आंदोलनानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकंच नाही तर त्यांना परिस्थितीमुळे देश सोडावा लागला. पण असं असताना देखील त्यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. हिंसक आंदोलनादरम्यान एका किराणा दुकाने वाल्याच्या हत्येप्रकरणी त्यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शेख हसीना या भारतात असून गाझियाबाद येथे सेफ हाऊसमध्ये आहेत. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, किराणा दुकानाचे मालक अबू सईद यांच्या हितचिंतकाने हा गुन्हा दाखल केला आहे.
19 जुलै रोजी मोहम्मदपूरमध्ये आंदोलनाच्या समर्थनार्थ निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबू सईद यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंसाचारात 560 पेक्षा जास्त लोकं ठार
बांगलादेशमधील हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याने ५ ऑगस्टला त्यांचं सरकार बरखास्त झालं होतं. या दरम्यान देशभरातील निदर्शनांमुळे 560 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडल्यानंतर, लष्कराच्या मदतीने एक अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आणि त्याचे मुख्य सल्लागार, 84 वर्षीय नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना बनवण्यात आले आहे.
मुहम्मद युनूस आणि बीएनपी नेत्यांची बैठक
अवामी लीगच्या कट्टर प्रतिस्पर्धी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सह सात राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे युनूस यांची भेट घेतली आणि सांगितले की अंतरिम सरकारला मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे आवश्यक आहे. शेख हसीना यांची सत्ता खाली खेचल्यानंतर ७९ वर्षीय माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यांना 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 17 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
इतर देशांकडून आश्रय नाही
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर प्रथम भारताकडे आश्रय मागितला होता. भारत सरकारने देखील तो मान्य केला आणि त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. भारतानंतर त्या लंडन जातील असं बोललं जात होतं. पण यूके सरकारने त्यांना आश्रय देण्यास टाळाटाळ केली. अमेरिकेनेही त्यांचा व्हिजा रद्द केल्याने अमेरिकेत जाण्याचे दरवाजे देखील त्यांच्यासाठी बंद झाले होते.