Explainer : ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून का बाहेर गेले? जाणून घ्या 5 कारणं
Explainer : अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी एक मोठी घटना घडली आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना बायडेन टक्कर देऊ शकले नाहीत. आता बायडेन यांच्याजागी ड्रेमोक्रॅटिक पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते? याची उत्सुक्ता आहे.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी देशवासियांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून माघारीचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच ते देशाला संबोधित करतील. चार दिवसांपूर्वीच बायडेन यांना कोरोनाची बाधा झाली होती. रविवारी बायडेन यांनी एक चिठ्ठी लिहून राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघारीचा निर्णय जाहीर केला. बायडेन यांनी डॅमोक्रेटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांना समर्थन देण्याविषयी मत व्यक्त केलं आहे. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असून सध्या त्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत.
ज्या बायडेन यांनी माघार घेण्याची पाच मोठी कारण
1 बायडेन यांच्या उमेदवारीला डेमोक्रॅटिक पक्षातंर्गत विरोध वाढत होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पिछाडीवर पडल्यानंतर पक्षाचे लोकच बायडेन यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकत होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांनी सुद्धा बायडेन यांना कमी होणाऱ्या जनसमर्थनावर चिंता व्यक्त केलेली. या दोन्ही नेत्यांनी सुद्धा बायडेन यांना माघारीसाठी आवाहन केलं होतं. पक्षांतर्गतही निवडणूक न लढण्यासाठी दबाव वाढत होता. बहुतांश अमेरिकन्स त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर नाराज होते. अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर त्यांना टीकेचा सामना करावा लागत होता.
2. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बायडेन यांची लोकप्रियता कमी झाली. ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा जो प्रयत्न झाला, त्यामुळे ट्रम्प यांच्या जन समर्थनात वाढ झाली आहे. ट्रम्प यांचे समर्थक या घटनेकडे हत्येचा प्रयत्न म्हणून पाहतात. याचा थेट परिणाम नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून येईल.
3. ज्यो बायडेन यांचं वाढत वय आणि स्मृती दोष यावर सतत प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. काही ठिकाणी बायडेन अडखळल्याचे, चालता चालत पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या. त्याशिवाय NATO समिटमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांना ते पुतिन म्हणाले. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव विसरले, त्यांना ट्रम्प म्हणून बोलावलं. म्हणून बायडेन यांचा विरोध वाढत चाललेला.
4. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रेसिडेंशियल डिबेट खूप महत्त्वाची असते. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यामध्ये मागच्या महिन्यात प्रेसिडेंशियल डिबेट झाली. यावेळी बायडेन अनेकदा अडखळताना दिसले. अनेक प्रसंगात ते खूप विचार करुन उत्तर देत होते. त्यामुळे संपूर्ण डिबेटमध्ये ट्रम्प यांचीच हवा दिसून आली. या डिबेटनंतर ट्रम्प यांनी बायडेन यांची खराब प्रकृतीवरुन हल्लाबोल केला. प्रेसिडेंशियल डिबेट मध्ये त्यांची एक प्रकारे हार झाली. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी घसरण झाली.
5. ज्या बायडेन यांची खराब प्रकृती हे त्यांनी माघार घेण्यामागच एक प्रमुख कारण आहेच. बायडेन यांचं वय आता 81 आहे. ते अनफिट दिसतात. बायडेन दिवसाला फक्त 6 तास काम करतात, असं सुद्धा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी बायडेनच स्वत: म्हणाले होते. डॉक्टर्सनी अनफिट घोषित केलं, तर ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर होतील.