दुबईच्या दिशेला निघालेल्या विमानात अचानक आग, 120 प्रवाशांनी श्वास रोखले, सुदैवाने….
नेपाळच्या काठमांडू विमानतळाहून 120 प्रवाशांना घेऊन एका विमानाने दुबईच्या दिशेला उड्डाण घेतलं होतं. पण विमानाने हवेत झेप घेतल्यानंतर एक अनपेक्षित प्रकार घडला.
काठमांडू : काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असं आपण म्हणतो. अगदी तशीच घटना आज काठमांडू येथे घडली. काठमांडू येथून 120 पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन दुबईच्या दिशेला उड्डाण घेतलेल्या एका विमानात अचानक आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या विमानाला आग लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे विमान अवकाशात उडत असताना जमिनीवर असलेल्या शेकडो नागरिकांना विमान दिसलं. अनेकांचा काळजाचा ठोका चुकला. विमानात आग लागल्यानी मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी नागरीक प्रार्थना करु लागले. सुदैवानी मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे 120 प्रवाशांचे प्राण वाचले.
नेपाळमध्ये एक मोठी विमान दुर्घटना सुदैवाने टळली आहे. नेपाळच्या काठमांडू विमानतळाहून 120 पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन एका विमानाने दुबईच्या दिशेला उड्डाण घेतलं होतं. पण विमानाने हवेत झेप घेतल्यानंतर एक अनपेक्षित प्रकार घडला. विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. त्यानंतर तातडीने विमानाची सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. संबंधित विमान हे फ्लाय दुबई कंपनीचं आहे. संबंधित घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. अगदी थरकाप उडवतील असे हे व्हिडीओ आहेत. या घटनेमुळे विमानातील प्रवाशी देखील घाबरले होते.
घटनेचा व्हिडीओ बघा
Fly Dubai plane catches fire on takeoff from Kathmandu airport, tries to land pic.twitter.com/jVaawRlwnV
— Spriter (@Spriter99880) April 24, 2023
नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांनी या घटनेविषयी माहिती जारी केली आहे. संबंधित विमानाला आता दुबईत पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच या विमानात 120 प्रवाशी हे नेपाळचे नागरीक होते तर 49 विदेशी नागरीक होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात रात्री नऊ वाजेच्या सुमारास इंजिनला अचानक आग लागली. त्यामुळे काठमांडू विमानतळावर खळबळ उडाली. आगीची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाई दुबई या विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतरच विमानतळावर इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर फ्लाईटच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी प्रयत्न करण्यात आले. सर्व यंत्रणा कामाला लागली आणि अखेर विमानाची सुरक्षित लँडिंग करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशी देखील घाबरले होते. पण सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
अमेरिकेतही अशीच घटना
विशेष म्हणजे नुकतंच अमेरिकेतही एका विमानाला आकाशात आग लागल्याची घटना समोर आली होती. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर आकाशात एका पक्षाची विमानाला धडक बसली. त्यानंतर विमानात आग लागली. ही आगाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. आग लागल्यानंतर लगेच या विमानाचं सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.