पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा कारभार आटोपला, इमरान खान यांना 10 वर्षाचा तुरुंगवास; काय आहे प्रकरण?
आधीच सत्तेपासून बेदखल झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान पुन्हा एकदा गोत्यात आले आहेत. इमरान खान यांना सिफर प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे इमरान खान यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कराची | 30 जानेवारी 2024 : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा कारभार आटोपला आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इमरान खान यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इमरान खान यांना हा मोठा झटका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे इमरान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सिफर प्रकरणी सुनावणी करणाऱ्या एका विशेष न्यायालयाने पीटीआयच्या या दोन्ही नेत्यांना प्रत्येकी दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश अबूल हसनत जुल्करनैन यांनी कलम 342 अनुसार दोन आरोपींची साक्ष नोंदवल्यानंतर लगेच शिक्षेची घोषणा केली होती. माजी पंतप्रधान आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांच्याविरोधात पक्षकारांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आरोप सिद्ध होऊ शकतात, असं कोर्टाने म्हटलं होतं.
काय आहे प्रकरण?
सिफरचं हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. अत्यंत गुप्त माहिती वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचा इमरान खान यांच्यावर आरोप आहे. सत्तेपासून बेदखल झाल्यानंतर इमरान खान यांनी थेट अमेरिकेवर आरोप केला होता. मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला होता. वॉशिंग्टन येथील एका अम्बेसीने मला एक गुप्त टेप पाठवली होती, असा दावाही इमरान खान यांनी केला होता. इमरान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या. त्यालाच सिफर असं म्हटलं जातं.
शांतता राखा
दरम्यान, पाकिस्तानच्या तहरीक ए इन्साफ पार्टीचे सचिव जनरल उमर अयुब खान यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच कोर्टाच्या निर्णयावर सवाल केले आहेत. याशिवाय सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं आहे. इमरान खान आणि शाह महमूद कुरैशी यांच्याविरोधात न्यायालयाचा निर्णय आला आहे. मात्र, पक्षाच्या सदस्यांनी शांतता बाळगायची आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी देशात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीवर पीटीआयच्या सदस्यांनी लक्ष केंद्रीत करावं. आपल्या उमेदवारांनाच मतदान करावं, असं आवाहन खान यांनी केलं आहे.