Israel-Hamas War | माणसंच काय चिटपाखरूही नाही… इस्रायलचं शहर बनलंय ‘घोस्ट टाऊन’; युद्धाचे भयानक परिणाम
हमास आणि इस्रायलच्या युद्धाला आज दहा दिवस पूर्ण झाली आहे. या दहा दिवसात इस्रायलचं अतोनात नुकसान झालं आहे. इस्रायलचं एक शहर तर घोस्ट टाऊन बनलं आहे. या शहरात शोधूनही माणूस सापडत नाही. इतकी स्मशान शांतता पसरलीय...
तेल अविव | 16 ऑक्टोबर 2023 : निर्मनुष्य रस्ते… ओस गल्ल्या… सर्वत्र रक्ताचे सडे… माणसंच काय चिटपाखरूही फिरकत नाही… दिवसाढवळ्याही या शहरात फिरताना अंगाचा थरकाप होतो. कालपर्यंत वर्दळ असलेल्या या शहराची स्मशानभूमी झालीय….जणू काही घोस्ट टाऊनमध्ये आल्याचा भास होतोय… इस्रायलमधील काही शहरांची अशीच अवस्था झाली आहे. 10 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाने सर्व काही पोळून निघालं आहे. माणसं मारली गेली, इमारती जमीनदोस्त झाल्या. संसार उद्ध्वस्त झाले… अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. युद्धाचे भयानक परिणाम इस्रायलच्या गल्लोगल्लीत दिसून येत आहेत.
इस्रायलचं स्तेदरात शहर हे त्याचं बोलकं उदाहरण आहे. या शहरावर युद्धाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. युद्धामुळे हे शहर ओकंबोकं झालं आहे. या शहरात दहा दिवसांपूर्वी गजबजाट होता. पार्ट्या सुरू होत्या. लोकांची रस्तोरस्ती वर्दळ सुरू होती. कुणाचं लग्न ठरलं होतं. तर कुणी परीक्षेची तयारी करत होता. कुणाला नवा जॉब लागला होता. तर कुणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं होतं. कुणी खरेदी करत होतं. तर कुणी विक्री करत होतं. सर्व काही सुशेगात चाललं होतं. सर्व आनंदी होते. मजेत होते. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न होती. उद्या काय करायचं याचा संकल्प होता. पण त्यांना काय माहीत शनिवारचा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरणार आहे.
काळा दिवस
गेल्या शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी हमासचे अतिरेकी स्तेदरात शहरात घुसले. या अतिरेक्यांनी शहरात घुसताच अंधाधूंद गोळीबार सुरू केला. दिसेल त्याला मारत सुटले. बाया पाहिल्या नाहीत. बापडे पाहिले नाहीत. लहान मुलं पाहिली नाहीत की अंथरूणाला खिळलेली म्हातारी माणसं पाहिली नाहीत. दिसेल त्याला ठोकलं. वाहनांवर गोळ्या घातल्या. घरांवर गोळ्या घातल्या. सर्वत्र रक्ताचे सडेच सडे पसरले. अन् काही तासात या शहराची स्मशानभूमी झाली.
अंगावर शहारे
या शहरात गेल्यावर अजूनही कुठे ना कुठे, काही ना काही धूमसताना दिसतंय. कुठल्या तरी घरातून, कोणत्या तरी इमारतीतून धूर येतोय. काही ना काही जळताना दिसतंय. रॉकेट आणि मिसाईलच्या माऱ्यामुळे या शहरात अनेक ठिकाणी आगी लागल्या. शेकडो लोक मारले गेले. प्रचंड मातम झाला. किंकाळ्या फोडत आणि आक्रोश करतच या शहरातील लोकांनी घरं सोडली. दूर निघून गेले. अन् हे शहर रिकामं झालं. ओकंबोकं झालं.
आता या शहरातील अंगण ओस पडलीत. गल्ल्यांमधून लहान मुलांचा गजबजाट ऐकायला मिळत नाही. कुणी खेळताना दिसत नाही. ना गाड्यांचा आवाज, ना घरातील टीव्हीचा आवाज. सर्व काही शांत शांत. सर्वत्र स्मशान शांतता. या शहरात घुसल्यावर ही स्मशान शांतताच जीवावर उठते. एखाद्या घोस्ट टाऊनमध्ये तर आलो नाही ना? अशी भीती मनात चमकून जाते.