Israel vs Hamas : मोठी धमकी, नेतन्याहू हुशारी दाखवून आता तरी एक पाऊल मागे घेतील का?
Israel vs Hamas : हमासच्या ताब्यात असलेल्या 6 इस्रायली बंधकांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर इस्रायलमध्ये आपल्या सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. बेंजामिन नेतन्याहू यांना हमासकडून एक मोठी धमकी मिळाली आहे. निदान आता, तरी नेतन्याहू हुशारी दाखवतील अशी अपेक्षा आहे.
गाझामध्ये 6 इस्रायली बंधकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर सीजफायर आणि बंधकांच्या सुटकेसाठी दबाव वाढला आहे. इस्रायली पंतप्रधानांच्या कठोर भूमिकेनंतर हमासच्या शस्त्र विभागाने इशारा दिला आहे. इस्रायली सैन्याची कारवाई सुरु राहिली, तर बंधक शवपेटीतून इस्रायलमध्ये येतील, असा इशारा हमासने दिला आहे. बंधकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुजाहिदीनना नवीन निर्देश देण्यात आले आहेत. “इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, सीजफायर न करता कारवाई सुरु ठेवली बंधक शवपेटीतूनच इस्रायलमध्ये पोहोचतील” असं एज्जेदीन अल कसम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू ओबैदा म्हणाले.
ज्या सहा बंधकांचे मृतदेह मिळाले, त्यांना हमासच्या दहशतवाद्यांनी फासावर लटवकलं, असं नेतन्याहू म्हणाले होते. “जे लोक बंधकांची हत्या करत आहेत, त्यांना गाजामध्ये युद्धविराम नकोय. हमासच्या दहशतवाद्यांसोबत हिशोब चुकता करणार” असं नेतन्याहू म्हणाले. सहा बंधकांच्या मृत्यूनंतर इस्रायलच्या लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. बंधकांच्या लवकरात लवकर सुटकेसाठी पीएम नेतन्याहू यांना आवाहन केलं.
इस्रायली लोक नेतन्याहू यांच्यावर खवळले
हमास आणि इस्रायलमध्ये युद्धविराम व्हावा, यासाठी मागच्या अनेक महिन्यांपासून अमेरिका, कतर आणि इजिप्त हे तीन देश प्रयत्न करत आहेत. गाजापट्टीतून इस्रायलने त्यांचं संपूर्ण सैन्य मागे घ्यावं, या मागणीसाठी हमास अडून बसला आहे. दुसऱ्याबाजूला हमासला संपवल्यानंतर युद्ध रोखणार अशी इस्रायलची भूमिका आहे. नेतन्याहू यांच्या या निर्णयावर इस्रायली जनता नाराज आहे. लवकरात लवकर तडजोड करुन मार्ग काढावा यासाठी नेतन्याहू यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. मागच्या 11 महिन्यापासून सुरु असलेल्या युद्धात इस्रायलच्या आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. 250 जणांना बंधक बनवलय. हमासच्या ताब्यात अजूनही इस्रायलचे 100 पेक्षा जास्त बंधक आहेत.