स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेने एका बेटासाठी बांगलादेश पेटवला?
बांगलादेशचे सर्वेसर्वा मोहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिराला भेट देत हिंदूंना सुरक्षेची हमी दिली. दुसरीकडे फक्त एका बेटासाठी अमेरिकेनंच संपूर्ण बांगलादेश आगीच्या खाईत लोटल्याचा आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केलाय.
हिंदूंवरच्या अत्याचारानंतर बांगलादेशचे सर्वेसर्वा मोहम्मद युनूस यांनी ढाकेश्वर मंदिराला भेट देत हिंदूंना सुरक्षेबाबत आश्वस्त केलंय. मंदिर भेटीनंतर युनूस यांनी स्थानिक हिंदूंशी बातचित करुन कट्टरतावाद्यांनाही उत्तर दिलं. काल-परवाच हिंदूंनी मोर्चा काढून बांगलादेशातल्या नव्या सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोहम्मद युनूस यांनी म्हटलंय की, बांग्लादेशात सर्वांना समान अधिकार आहेत. इथं हिंदू-मुस्लिम भेद करु नका. हिंदूंसह सर्व अल्पसंख्यक समुहाची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे. इथले हिंदू बांगलादेशचे नागरिक नाहीत का? असा सवालही युनूस यांनी कट्टरपथियांना केलाय.
नव्या लोकशाही मुल्यात आपण हिंदू-मुस्लिम-बौद्ध म्हणून नव्हे तर माणूस म्हणून उभं राहायचं आहे. व्यवस्था नेस्तनाबूत झाल्यानं ही वेळ उद्भवलीय. लवकरच परिस्थिती सुधारेल. आम्हाला एक संधी द्या. पुन्हा कधीही हिंदूंवर तक्रारीची वेळ येणार नाही, असं मोहम्मद युनूस यांनी आश्वासन दिलं. बांगलादेशातला एक गट भारताला शेख हसीना समर्थक मानत आला आहे. त्यात हसीना यांना तात्पुरत्या स्वरुपात भारतानं आश्रय दिल्यामुळे त्यात अजून भर पडलीय. अशात मोहम्मद युनूस यांनी भारताला आवाहन करताना म्हटलंय की, बांगलादेशात लोकनियुक्त व्यक्तीला भारतानं सहकार्य करायला हवं. एकमेकांना संशयाच्या नजरेनं बघण्यापेक्षा संबंध सुधारावर भर दिला जावा. मात्र खालिदा जियांच्या बीएनपी पक्षानं हसीना यांना भारतानं दिलेल्या आश्रयावर नाराजी व्यक्त केलीय.
दुसरीकडे शेख हसीना यांनी बांग्लादेशात भडकलेल्या आगीसाठी अमेरिकेला जबाबदार धरलंय. एक बेट अमेरिकेच्या हवाली करण्यास विरोध केल्यामुळेच अमेरिकेनं आपल्याला सत्तेतून बेदखल केल्याचा आरोप हसीनांनी केलाय. या बेटाचं नाव सेंट मार्टिन असं आहे.
सेंट मार्टिन बेट काय आहे, ते महत्वाचं कशासाठी?
बांगलादेशला लागून भारताचं त्रिपूरा राज्य आहे. याच त्रिपूरापासून ३०० किलोमीटर दूर बंगालच्या खाडीत बांगलादेशच्या मालकीचं सेंट मार्टीन नावाचं बेट आहे. बांगलादेशच्या सीमेवरच्या कॉक्स बाजार या जिल्ह्यापासून हे बेट फक्त 9 किलोमीटर आहे. तर बाजूच्या म्यानमारपासून हे फक्त ८ किलोमीटर दूर आहे. 3 वर्ग किलोमीटर पसरलेल्या या छोट्या बेटावर फक्त 3 हजार 700 लोक राहतात. ब्रिटीश राजवटीवेळी या बेटचं नाव सेंट मार्टिन पडलं.
बंगाल खाडीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या बेटाचं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. स्टेट ऑफ मलक्का म्हणजे या मार्गानं बंगालच्या खाडीतून सर्वाधिक समुद्री व्यापार होतो. त्या व्यापाऱ्यावर सेंट मार्टीन बेटावरुन बारीक लक्ष आणि नियंत्रणही ठेवता येतं. मात्र या बेटावर अमेरिकेचा डोळा का? तर 2023 ला बांगलादेशच्या कॉक्स बाजार भागात चीननं बंदराची उभारणी केलीय. शिवाय स्टेट ऑप मलक्कातूनच चीनचा सर्वाधिक व्यापार होतो. त्यामुळेच अमेरिकेला सेंट मार्टीन बेटवर विमानतळ बनवण्याची परवानगी हवी असल्याचा दावा केला जातोय.
दुसरीकडे मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे सर्वेसर्वा बनल्यानंतर २४ तासातच त्यांच्यावरच्या साऱ्या खटल्यांमधून निर्दोष सोडलं गेलंय. शेख हसीना सरकारनं डझनभराहून जास्त गुन्हे युनूस यांच्याविरोधात नोंदवले होते. त्या सर्वांमधून युनूस मुक्त झाले आहेत. आता युनूस यांच्यापुढे बांग्लादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवर अत्याचार रोखून देशाची घडी पुन्हा सुरळीत करण्याचं आव्हान आहे.