पेजर ब्लास्टनंतर हिजबुल्लाहची सटकली, शेकडो रॉकेटचा मारा; इस्रायल हादरले
लेबनान पुन्हा एकदा हादरून गेलं आहे. इस्रायलच्या सैन्याने आपला मागोवा घेऊ नये, आपलं लोकेशन ट्रेस करू नये म्हणून हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने गेल्या वर्षी ‘ब्रेक युवर फोन’ ही मोहीम हाती घेतली होती. लेबनानमध्ये पेजर्सचा वापर सुरू झाला होता. पण इस्रायलने या पेजर्समध्येच स्फोट घडवून आणला आहे. त्यामुळे हिजबुल्लाहची चांगलीच सटकली आहे.
लेबनानमध्ये पेजर ब्लास्ट झाल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलविरोधात युद्ध पुकारलं आहे. लेबनानमधील संघटना हिजबुल्लाहने आज इस्रायलच्या सीमेवरील तळांवर धडाधड रॉकेटचा मारा केला आहे. हिजबुल्लाहने शेकडो रॉकेटचा मारा केला आहे. एका रिपोर्टनुसार हिजबुल्लाहने पहिल्यांदाच इस्रायलच्या विरोधात सीमेवर एवढा मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आता मोठं युद्ध भडकण्यार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील नागरिक भयभीत झाले आहेत.
मंगळवार 17 सप्टेंबर रोजी लेबनानमध्ये एकाचवेळी अनेक पेजरचा स्फोट झाला. यामुळे हिजबुल्लाहचे अनेक सैनिक अपंग झाले. काही जायबंदी झाले तर सर्वच जखमी झाले. या हल्ल्यात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचे कनेक्शन इस्रायलशी आहे. या हल्ल्यात इस्रायलचाच हात असल्याचा आरोप हिजबुल्लाहने केला आहे. पण हिजबुल्लाहने इस्रायली सैन्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
पेजरचा वापर का?
जग 21 व्या शतकात आलं आहे. संपूर्ण जगाकडे मोबाईल आहेत. अशावेळी हिजबुल्ला या संघटनेचे सैनिक पेजर्सचा वापर का करत होते? असा सवाल सर्वांनाच पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण म्हणजे इस्रायलच्या सैन्याला आपला ठावठिकाणा लागू नये म्हणून हिजबुल्लाहचे सैनिक पेजर्सचा वापर करत होते. पेजर्समुळे लोकेशन ट्रेस होत नाही. मोबाईलमुळे लोकेशन ट्रेस होत होतं. लोकेशन ट्रेस झाल्यास जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळेच गेल्यावर्षी हिजबुल्लाहने ‘ब्रेक युवर फोन’ ही मोहीम राबवली होती.
काय आहे पेजर?
पेजर हे एक वायरलेस टेली कम्युनिकेशन डिव्हाईस आहे. मोबाईलचं आगमन होण्यापूर्वी भारतातही पेजर्स वापरले जात होते. पेजरचा वापर केवळ व्हॉइस आणि टेक्स्ट मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. त्यातून वन टू वन संभाषण होत नाही. मात्र, पेजर्स ब्लास्ट झाल्याने लेबनान हादरून गेलं आहे. लेबनानच नव्हे तर अख्खं जगच हादरून गेलं आहे. इस्रायलने अत्यंत आधुनिक तंत्राचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याने इस्रायल काहीही करू शकतो, याची चुणूक दिसून आली आहे.
थिअरी काय?
पेजर्स ब्लास्ट कसा झाला यावर हिजबुल्लाहकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पेजर्सच्या बॅट्री अत्यंत गरम करण्यात आल्या होत्या, त्यामुळे लिथियम बॅट्री गरम होऊन त्यांचा स्फोट झाला. या बॅट्री कशाच्या तरी संपर्कात आणल्या गेल्या असाव्यात, असं सांगितलं जात आहे. तर जाणकारांनी मात्र, ही थेअरी नाकारली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेजर्समध्ये ब्लास्ट घडवून आणणं अशक्य आहे, असं जाणकारांचं मत आहे.