पाकिस्तानात कशा होतात निवडणुका? फक्त हीच व्यक्ती होऊ शकते पंतप्रधान
Pakistan election 2024 : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज यासाठी मतदान पार पडले आहे. पाकिस्तानातील निवडणुका या भारतातील निवडणुकीपेक्षा कसे वेगळे असतात. पाकिस्तानात निवडणुका कशा घेतल्या जातात. कोणता व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो जाणून घेऊयात.
Pakistan Election : पाकिस्तानात आज सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात सत्तेत येण्यासाठी लष्कराचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. जो सध्या नवाझ शरीफ यांच्याकडे असल्याने ते चौथ्यांदा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान सुरु होताच काही ठिकाणी परिस्थिती बिघडलेली पाहायला मिळाली. ज्यामुळे मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती. दुसरीकडे खैबर पख्तुनख्वामध्ये दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये तैनात चार पोलिसांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची बातमी आहे.
भारतात देखील यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. आपल्या देशात निवडणुका कशा होतात हे आपल्याला माहित आहे. पण आज आपण पाकिस्तानमध्ये पंतप्रधान कसे निवडले जातात. निवडणुकीत मतदान कसे होते? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानमध्ये होणारी निवडणूक ही भारतापेक्षा वेगळी आहे. भारतात ईव्हीएमने मतदान होते. पाकिस्तानात मात्र अजूनही बॅलेट पेपर वापरले जाते. पाकिस्तानच्या खालच्या सभागृहात 342 सदस्य असतात. त्यापैकी 272 जागांवर थेट निवडणुका होतात. यामध्ये महिलांसाठी 60 जागा असतात तर अल्पसंख्याकांसाठी 10 जागा राखीव आहेत.
जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो, त्या पक्षाचे जास्त सदस्य नामनिर्देशित केले जातात. पाकिस्तानच्या सिनेटची निवड वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे केली जाते. हे भारतातील राज्यसभा निवडणुकीसारखे असते.
कोण बनू शकतो पंतप्रधान
पाकिस्तानमध्ये 272 जागांपैकी बहुमत असलेला पक्षाचा पंतप्रधान होतो. पंतप्रधान हा पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचा (MNA) सदस्य असावा लागतो. पाकिस्तानचा पंतप्रधान केवळ मुस्लीम धर्माचा व्यक्तीच असू शकतो. पंतप्रधान पदाचा उमेदवार सहकारी MNA ने प्रस्तावित केला पाहिजे. यानंतर एक अनुमोदक देखील असावे लागते. जर निवडणूक लढवणारा एकच उमेदवार असेल आणि त्याने विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी बहुसंख्य मते मिळवली, तर सभापती त्याला निवडून आलेला पंतप्रधान म्हणून घोषित करतील.
किती उमेदवार रिंगणात
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) मते, नॅशनल असेंब्लीसाठी 5,121 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 4,807 पुरुष, 312 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. चार प्रांतीय विधानसभांसाठी १२,६९५ उमेदवार रिंगणात आहेत, त्यात १२,१२३ पुरुष, ५७० महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.