Ismail Haniyeh Killed : मध्यरात्री 2 ची वेळ, स्पेशल ऑपरेशनमध्ये इस्रायलने हमास चीफला कसं संपवलं?
Ismail Haniyeh Killed : इस्रायलने एक स्पेशल ऑपरेशन केलं. त्यात त्यांनी हमासच्या प्रमुखाला संपवलं. इस्माइल हानियाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच त्या रात्रीच इस्रायलने ऑपरेशन केलं. इस्रायलने नेमकी हा कारवाई कशी केली? त्या बद्दल समजून घ्या.
इस्रायलने त्यांचा सर्वात मोठा शत्रू इस्माइल हानियाची आज हत्या केली. तेहरान येथे एका अपार्टमेंटमध्ये हानिया उतरला होता. हानियासोबत त्याचा बॉडीगार्ड सुद्धा मारला गेला, असं इराणी सैन्याने सांगितलं. अजूनपर्यंत कोणीही अधिकृतपणे या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय आहे. 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलवर मोठा हल्ला झाला, त्यानंतर इस्रायलने हमासच्या टॉप लीडरशिपला संपवण्याचा संकल्प सोडला होता. हमासने एक स्टेटमेंट जारी करुन इस्माइल हानियाच्या मृत्यूचा बदला घेणार असं म्हटलं आहे.
हमास प्रमुख इस्माइल हानिया मंगळवारी इराणचे नवीन राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी झाला होता. या दरम्यान त्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची भेट घेतली. त्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. इस्माइल हानियाला राजकीय पाहुण्याचा दर्जा देण्यात आला होता. इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात अनेक देशांचे नेते तेहरानमध्ये पोहोचले होते.
इस्रायलकडे आधीपासून काय माहिती होती?
इराणच्या राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यात इस्माइल हानिया सहभागी होणार, याची इस्रायलला आधीपासून माहिती होती. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद हानियावर नजर ठेऊन होती. तो, ज्या ठिकाणी उतरलेला तिथली अचूक माहिती इस्रायली सैन्याकडे पाठवली. त्यानंतर अचूक हल्ला करण्यासाठी सक्षम असलेल्या गाइडेड मिसाइलने हानियाच्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलं. तेहरान येथे झालेल्या या हल्ल्यात हानिया आणि त्याचा बॉडीगार्ड ठार झाला.
एरियल प्रोजेक्टाइलचा वापर
उत्तर तेहरानमध्ये इस्माइल हानिया मुक्कामाला होता. मध्यरात्री 2 च्या सुमारास “एरियल प्रोजेक्टाइल” लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्या प्रोजेक्टाइलबद्दल जास्त माहिती नाहीय. IRGC कडून ही माहिती देण्यात आलीय. हिजबुल्लाहशी संबंधित अल-मायादीनने अज्ञात इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, परदेशातून मिसाइल डागून ही हत्या करण्यात आली.