पाकिस्तानात संवैधानिक पेच, इम्रान काळजीवाहू पंतप्रधान, जाणून घ्या पाकिस्तानात नेमकं काय घडतंय
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन दावे-प्रतिदावे होत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय आणि घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणि संसद सभागृह बरखास्त करण्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
मुंबई : पाकिस्तानात (Pakistan) गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या 24 तासांत पाकिस्तानचा राजकीय चेहरामोहरा पूर्णपणे बदलला. पंतप्रधानपदाचा वाद आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात जाउन पोहचला आहे. कालपर्यंत 5 वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्या इम्रान खान यांना आपल्या सत्तेची 4 वर्षेही पूर्ण करता आलेली नाहीत. इम्रान खान (Imran Khan) पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले आहेत. तरतुदीनुसार ते पुढील 15 दिवस काळजीवाहू पंतप्रधान (Caretaker PM) म्हणून काम पाहणार आहेत. इम्रान खान यांच्या शिफारशीवरून संसद बरखास्त करण्यात आली आहे. या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार आहेत. पाकिस्तानचा हा राजकीय पेच सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर आजही सुनावणी होणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच विरोधकांना आशा आहे.
काय झाले पाकिस्तानात?
1) अविश्वास प्रस्ताव फेटाळला
उपसभापती कासिम सूरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यांनी अविश्वास प्रस्ताव हे परकीय षडयंत्र असल्याचे म्हणत तो फेटाळून लावला. कासिम सूरी म्हणाले की, पंतप्रधानांविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव असंवैधानिक आहे. त्यांनी सभागृहाचे कामकाज 25 एप्रिलपर्यंत तहकूब केले.
2) संसद विसर्जित
अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांची भेट घेतली. त्यांनी संसद विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याचे आवाहन केले. इम्रान खान यांच्या शिफारशीनंतर आरिफ अल्वी यांनी कनिष्ठ सभागृह असलेली नॅशनल असेंब्ली विसर्जित केली. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर इम्रान यांनी देशाला संबोधित करताना अविश्वास प्रस्तावाला परकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. नंतर इम्रान खान अधिकृतपणे पंतप्रधान पदापासून दूर झाले.
3) सुप्रीम कोर्टाची स्वतःहून दखल
पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय संकटाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळताना आणि संसद बरखास्त करताना घटनात्मक प्रक्रियेचे पालन केले गेले, की नाही याचा निर्णय आता सरन्यायाधीश घेणार आहेत.
काय आहेत शक्यता?
1) सर्वोच्च न्यायालय संपूर्ण प्रक्रिया असंवैधानिक घोषित करु शकते
पाकिस्तानचा हा राजकीय पेच सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर आजही सुनावणी होणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच विरोधकांना आशा आहे. पाकिस्तानच्या राज्यघटनेचे तज्ज्ञ सलमान अक्रम राजा यांनी सांगितले की, ज्या प्रकारे उपसभापतींनी अविश्वास प्रस्ताव फेटाळला आणि त्यानंतर संसद बरखास्त केली, ते असंवैधानिक आहे.
या संपूर्ण वादावर आता सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल. हे संपूर्ण प्रकरण उपसभापतींशी संबंधित असल्याचे ते म्हणाले. जर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, की अविश्वास प्रस्ताव फेटाळणे घटनात्मक असेल, तर पंतप्रधानांनी संसद बरखास्त करण्याची केलेली शिफारसही योग्य असल्याचे सिद्ध होईल. मात्र, पाकिस्तानमध्ये जे काही घडले ते घटनाबाह्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुप्रीम कोर्ट बारचे अध्यक्ष एहसान भुन म्हणाले, पंतप्रधान आणि उपसभापतींनी असंवैधानिक पाऊल उचललं आहे. भारतातली प्रसिद्ध वकील आणि माजी केंद्रीय मंत्री अभिषेक मनु सिंघवी यांनी याला घटनाबाह्य म्हटले आहे.
2) 90 दिवसांत निवडणुका होतील
पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांनी सांगितले, की इम्रान खान पुढील 15 दिवस काळजीवाहू पंतप्रधान राहतील. त्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची तरी नियुक्ती केली जाईल. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, येत्या 90 दिवसांत पाकिस्तानमध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेख रशीद म्हणाले, की आता होणाऱ्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर केला जाणार नाही.
3) पंजाबमध्येही पेच
दरम्यान, पंजाब हे पाकिस्तानातील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. येथे इम्रान यांच्या पक्षाचे ‘पीटीआय’चे सरकार होते. आपल्या सहकाऱ्याला सोबत आणण्यासाठी इम्रानने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उस्मान बजदार यांचा राजीनामा घेतला होता.
त्यानंतर इम्रान यांनी ‘एमक्यूएम-पी’चे चौधरी परवेझ इलाही यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार केले. पंजाबमध्ये उद्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी मतदान होणार होते, मात्र त्याआधीच इम्रान यांनी तेथील गव्हर्नर चौधरी सरवर यांची हकालपट्टी केली. यानंतर येथील विधानसभाही 6 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली.
संबंधित बातम्या
Imran Khan : जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ लपून मोदींना भेटले, इम्रान खान यांचा पुन्हा खळबळजनक दावा