Imran Khan: पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी माजी मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद?; इम्रान खान यांनीच केली नियुक्ती
इम्रान खान (Imran Khan) यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर पाकिस्तानचे (Pakistan) माजी मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद (Gulzar Ahmed) यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
लाहोर: इम्रान खान (Imran Khan) यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर पाकिस्तानचे (Pakistan) माजी मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद (Gulzar Ahmed) यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी इम्रान खान यांना या संदर्भात पत्रं लिहिलं होतं. त्यानंतर इम्रान यांनी तहरीक ए इन्साफ या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर गुलजार अहमद यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यास इम्रान खान यांनी संमती दर्शवली होती. त्यामुळे अहमद यांची काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी ट्विटरवरून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने म्हणजे निवडणुका येऊन नवं सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत गुलजार अहमद हे पंतप्रधान म्हणून पाकिस्तानचा कारभार पाहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी सोमवारी एक नोटिफिकेशन जारी करून इम्रान खान हे काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत पंतप्रधानपदी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पाकिस्तानच्या संविधानाच्या अनुच्छेद 224 ए (4)च्या अंतर्गत नव्या काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्त होईपर्यंत इम्रान अहमद खान नियाजी पाकिस्तानचे पंतप्रधान असतील, असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवले
दुसरीकडे कॅबिनेट सचिवालयाने एक नोटिफिकेशन काढून इम्रान खान यांना तात्काळ प्रभावाने पाकिस्तानच्या पंतप्रधापदावरून हटवण्यात आल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेत एकूण 342 सदस्य आहेत. नॅशनल असेंबलीत इम्रान खान यांना बहुमतासाठी 172 जागांची आवश्यकता आहे. विरोधकांचा दावा आहे की त्यांच्याकडे 174 सदस्यांचं संख्याबळ आहे. याचा अर्थ इम्रान खान यांच्याकडे संसदते बहुमत नाही.
कोर्टाचा फैसला उद्या
पाकिस्तानच्या संसदेत विरोधकांनी रविवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी केली होीत. मात्र, असेंबलीचे उपाध्यक्ष कासिम सूरी यांनी पंतप्रधानांविरोधातील अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. त्यामुळे विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. मात्र कोणताही निर्णय झाला नाही. उद्या कोर्टात या प्रकरणावर काही निर्णय होण्याची शक्यात आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय योग्य ठरतो की विरोधकांचा यावर पाकिस्तानातील निवडणुकांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.
संबंधित बातम्या:
पाकिस्तानात संवैधानिक पेच, इम्रान काळजीवाहू पंतप्रधान, जाणून घ्या पाकिस्तानात नेमकं काय घडतंय