इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक, कोणत्या प्रकरणात अटकेची कारवाई होणार
२८ फेब्रुवारीला इम्रान खान यांना अनेक खटल्यांमध्ये हजर करण्यात आले. वेगवेगळ्या कोर्टात सुनावणी झाली. त्यात त्यांना एक प्रकरण वगळता इतर प्रकरणात दिलासा मिळाला.
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. पोलिस अटक वॉरंट घेऊन त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इम्रान खान विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान, पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफचे नेते आणि इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र येण्यास सांगितले आहे. इम्रान खानला अटक झाल्यास देशात अराजकता पसरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
फवाद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न झाल्यास गंभीर परिणाम होतील. याबाबत अकार्यक्षम व देशद्रोही सरकारला आम्ही इशारा देतो की, त्यांनी गांभीर्याने काम करावे. पाकिस्तानला आणखी एका संकटात ढकलू नये. मी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जुमन पार्कमध्ये पोहोचण्याचे आवाहन करतो.
तोशाखाना प्रकरणात दिलासा नाही
28 फेब्रुवारीला इम्रानला अनेक खटल्यांमध्ये हजर करण्यात आले. वेगवेगळ्या कोर्टात सुनावणी झाली. त्यात त्यांना तोशाखान प्रकरण वगळता इतर प्रकरणात दिलासा मिळाला. पण तोशाखाना प्रकरणात त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. न्यायालयाने इम्रानविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
कोणत्या प्रकरणात अटक होणार
सत्ताधारी पाकिस्तानी डेमोक्रेटिक मूवमेंटने निवडणूक आयोगाकडे तोशाखाना भेट प्रकरण उचलले होते. इम्रानने आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले. इम्रानने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्याने या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यानंतर त्याची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. परंतु तपासात ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.