Imran Khan : इम्रान खान यांची कॅप्टन इनिंग यशस्वी, पण विरोधकांची गुगली, आता कोर्टात होणार फैसला; पाकिस्तानात नेमकं काय होणार?
इम्रान खान यांची सत्ता जाणार अशी सर्वत्र चर्चा होती. विरोधकांनी जोरदार तयारी केली होती. पण परीक्षेला सामोरं जाण्याआधीच संसदेनं हा ठराव फेटाळून लावला.
इस्लामाबाद : पाकिस्तानात आता राजकीय पेचप्रसंग निर्माण झालाय. रविवारी संसदेमध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारमधील मंत्री चौधरी फवाद हुसेनने प्लॅन बी अजमावला आणि काही क्षणातच विरोधकांची तारांबळ उडाली आणि ‘कॅप्टनचा प्लॅन बी’ यशस्वी झाला. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी (Opposition Party) इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडला. त्यावर आज मतदान (Vote) होणार होते. इम्रान खान यांची सत्ता जाणार अशी सर्वत्र चर्चा होती. विरोधकांनी जोरदार तयारी केली होती. पण परीक्षेला सामोरं जाण्याआधीच संसदेनं हा ठराव फेटाळून लावला. संसदेत फवाद हुसेन म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव हा सामान्यतः लोकशाही अधिकार आहे. घटनेच्या कलम 95 अन्वये अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. परंतु दुर्दैवाने परकीय सरकारकडून सत्ता परिवर्तनासाठी हे प्रभावी ऑपरेशन आहे.
अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची राष्ट्रपतींना शिफारस केली. या खेळीत इम्रान खान यशस्वी झाले. पण त्यानंतरही विरोधकांनी स्वत:च संसद चालवू अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. नंतर राष्ट्रपतीने संसद विसर्जित केल्याचं जाहीर केल्यानंतर विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यामुळे आता संसद बरखास्त वैध ठरवायची की नाही याचा चेंडू कोर्टाच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं? पाकिस्तानात काय राजकीय ड्रामा होतो, याकडे सर्वांंच लक्ष लागलं आहे.
त्यांच्या भाषणानंतर काही क्षणातच संसदेचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी अविश्वास ठराव फेटाळून लावला आणि कामकाज तहकूब केले. संसदेची पुढील बैठक 25 एप्रिल रोजी होणार आहे. उपसभापतींनी हे परकीय सरकारकडून करण्यात आलेलं कटकारस्थान असल्याचा आरोप करत अविश्वास प्रस्ताव फेटाळला. हे असंवैधानिक असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
इम्रान खान यांच्या हत्येची भीती
यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या होऊ शकते आणि सुरक्षा यंत्रणांना या कटाची माहिती मिळाली आहे, असा खळबळजनक दावा केला होता. हे वृत्त आल्यानंतर त्वरित इम्रान खान यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. यापूर्वी पीटीआयचे नेते फैसल वावडा यांनीही असाच दावा केला होता.
परकीय शक्तींचा हात
दरम्यान या घटनेवर इम्रान खान प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणालेत, ‘परकीय शक्तींद्वारे हे कारस्थान रचण्यात आलं होतं, सरकार पडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आता अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय याबद्दल मी पाकिस्तानी जनतेचं अभिनंदन करतो. संसद विसर्जित करावी असा सल्ला मी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना दिलाय. त्यामुळे पाकिस्तानी जनतेनं पुन्हा निवडणुकांची तयारी करावी.’
कर्णधाराकडे नेहमीच एकापेक्षा जास्त प्लॅन्स असतात
एका मुलाखतीत इम्रान खान म्हटले होते की कोणीही काळजी करण्याची गरज नाही त्यांचा हा प्रस्ताव मी सभागृहात मोडून काढेन कारण माझ्याकडे एकापेक्षा जास्त प्लॅन्स आहेत.कर्णधाराकडे नेहमीच एकापेक्षा जास्त प्लॅन्स असतात. तसाच माझ्याकडेही एक प्लॅन आहे. जर अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही जिंकणार आहोत.पण हे बोलत असताना इम्रानने आपला प्लॅन उघड केला नव्हता. अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर मात्र हाच हा इम्रानचा प्लॅन बी असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या: