भारत की चीन? कोण आहे रशियासाठी सर्वात जवळचा मित्र, रशियाने दाखवून दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यातील या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदींच्या या रशिया दौऱ्यात त्यांनी त्यांच्यासाठी भारत हा किती महत्त्वाचा देश आहे हे दाखवून दिले आहे. चीन आणि भारत यापैकी कोणत्या देशाला रशिया अधिक जवळचा मानतो हे त्याने दाखवून दिले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाचा रशिया दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद पार पडली. पीएम मोदी तब्बल ५ वर्षांनंतर रशियाला गेले होते. सध्या भारत आणि चीन हे सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या रशियाच्या सर्वात जवळचे देश आहेत. यासोबत ते एकमेकांचे कट्टर स्पर्धक देखील आहेत. आता रशियामध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतानंतर सध्या कोणता देश रशियाच्या जवळ आहे आणि सध्याच्या परिस्थितीत रशियासाठी भारत किंवा चीन कोणता देश अधिक महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट झाले आहे.
रशियाच्या गरजा काय आहेत?
रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. अमेरिकेने इतर देशांवर देखील यासाठी दबाव टाकला होता. युक्रेनला हे देश उघडपणे पाठिंबा देत आहेत. अशा वेळी रशियाला त्याच्या सोबत कोणते देश आहेत हे दाखवायचे होते. भारताचे रशियाशी स्वातंत्र्य काळापासूनच खूप चांगले संबंध राहिले आहेत. चीनची पर्वा न करता रशियाने जम्मू-काश्मीर, दहशतवाद यासह विविध मुद्द्यांवर नेहमीच भारताला पाठिंबा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अधिकृत रशियाच्या दौऱ्यावर गेले तेव्हा विमानतळावरूनच त्यांनी चीनला स्पष्ट संदेश दिला. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव हे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. मोदींंना त्यांनी कारमध्ये बसवून हॉटेलमध्ये देखील सोडले. गेल्या वेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग जेव्हा रशियाला गेले होते. तेव्हा देखील त्यांचे यांचे असे स्वागत झाले नव्हते. जिनपिंग यांचे रशियाच्या खालच्या स्तराच्या उपपंतप्रधानांनी स्वागत केले होते.
निवासस्थानी एकत्र जेवण
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या घरी बोलावले होते. पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नोवो-ओगार्योवो या निवासस्थानी स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणही केले. विशेष म्हणजे पीएम मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांनीही अनौपचारिक खाजगी बैठक घेतली. या बैठकीत जगातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
व्लादिमीर पुतिन यांनी या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक केले. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी मोदींचे अभिनंदन केले. पुतिन म्हणाले की, हा योगायोग नसून तुमच्या अनेक वर्षांच्या कामाचे फळ आहे. तुम्ही खूप उत्साही व्यक्ती आहात, भारत आणि भारतीय लोकांच्या हिताचे परिणाम साध्य करण्यास सक्षम आहात. पंतप्रधान मोदींनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या लोकांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे आणि लोकांना ते जाणवू शकते.
भारत-रशिया संबंध अधिक घट्ट
पीएम मोदी यांची पुतीन यांच्या सोबतची भेट अशा वेळी होत आहे जेव्हा संपूर्ण जग पुन्हा एकदा दोन गटात विभागलेले दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पीएम मोदी आणि पुतिन यांच्या भेटीकडे होते. गेल्या काही दिवसात भारत आणि रशियामधील संबंध आणखी घट्ट झाले आहेत. अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमधील भागीदारी वाढली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत आहे, ज्याचा भारताला फायदा तर होत आहेच पण रशियाची अर्थव्यवस्थाही मजबूत होत आहे.