Israel attack on Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणची कंबर मोडली, हवाई संरक्षण रडार यंत्रणा उद्ध्वस्त, इराणच्या हवाई क्षेत्राची सुरक्षा धोक्यात
Israel attack on Iran: इस्रायलने तेहरान, खुजेस्तान आणि इलाम प्रांतातील काही लष्करी तळांच्या काही भागांना लक्ष्य केले आहे. अनेक महत्वाचे तेल आणि पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी तैनात असलेली हवाई संरक्षण रडार यंत्रणा निकामी केली.
इस्रायल आणि हमास युद्ध पेटलेले होते. त्या युद्धात इराणने उडी घेतली. इराणने इस्त्रायलवर 1 ऑक्टोंबर रोजी भीषण हल्ला केला. त्या हल्ल्यात इस्त्रायलचे मोठे नुकसान झाले नाही. परंतु त्यानंतर इस्त्रायलने आपण बदला घेणार असल्याचे जाहीर केले. शनिवारी इस्त्रायलने इराणावर हल्ला केला. इस्त्रायलच्या लष्करी तळ, इंधन पुरवठा केंद्रांना लक्ष करण्यात आले. तसेच इस्त्रायलने सीरियातही हल्ले केले. इराणच्या तीन अधिकाऱ्यांनी इस्त्रायलच्या या हल्ल्यात इराणची हवाई संरक्षण रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे मान्य केले.
हवाई संरक्षण रडार यंत्रणा निकामी
इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले की, इस्रायलने तेहरान, खुजेस्तान आणि इलाम प्रांतातील काही लष्करी तळांच्या काही भागांना लक्ष्य केले आहे. अनेक महत्वाचे तेल आणि पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठी तैनात असलेली हवाई संरक्षण रडार यंत्रणा निकामी केली. इस्त्रायलच्या या हल्ल्यात ज्या हवाई संरक्षण यंत्रणेस फटका बसला ती म्हणजे खुजेस्तान प्रांतातील विशाल इमाम खोमेनी पेट्रोकेमिकल येथे बसवलेली प्रणाली होती. त्याच्या जवळ असलेले इमाम खोमेनी हे मोठे आर्थिक बंदर आणि अबदान ऑइल रिफायनरी यांचे संरक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आलेली हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झाली.
संघर्ष थांबला नाही तर…
अधिकाऱ्यांनी म्हटले की, तांगे बिजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलाम प्रांतातील गॅस फील्ड रिफायनरीमधील हवाई संरक्षण यंत्रणेलाही फटका बसला आहे. यापैकी एक इराणच्या तेल मंत्रालयाशी संबंधित आहे. इराणने हवाई रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्यामुळे इराणसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष सुरुच राहिला तर भविष्यात इराणमधील इतर उर्जा प्रकल्प आणि आर्थिक केंद्रही धोक्यात येऊ शकतात, असे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
आता पुढील धोके समजून घ्या…
इराणच्या तेल आणि वायू उद्योगातील तज्ज्ञ आणि इराण-इराक चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य हमीद हुसेनी यांनी सांगितले की, इस्रायलने आम्हाला स्पष्ट संदेश दिला आहे. त्यातून आम्ही धोके समजून घेणे गरजेचे आहे. यापुढे तणाव निर्माण होऊ देऊ नये. आता इराणने पुन्हा इस्त्रायलवर हल्ला केला तर या युद्धात अमेरिका देखील सामील होऊ शकते. अमेरिकेने इस्रायलला म्हटले होते की, इराणचे ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करु नये, त्यानुसार इस्त्रायलने हवाई हल्ले केले.