Ibrahim raisi death : हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर इराणवर आली कट्टर शत्रूकडे मदत मागण्याची वेळ
Ibrahim raisi death : राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर इराण खूप हतबल झाला. त्यांच्यावर आपल्या कट्टर शत्रूकडे मदत मागण्याची वेळ आली. दाट धुक्यांमुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. ते 40 वर्ष जुनं हेलिकॉप्टर होतं.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्र्यांचा सोमवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेवर अनेक देशांनी दु:ख व्यक्त केलय. या दु:खद प्रसंगात इराणसोबत असल्याच म्हटलं आहे. इराणचे राष्ट्रपती रईसी रविवारी एका धरणाच उद्गाटन करण्यासाठी अजरबैजान येथे गेले होते. या कार्यक्रमानंतर अजरबैजानहून रईसी परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या दरम्यान अमेरिकेने एक विधान केलय. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर इराणने आपल्याकडे मदत मागितली होती, असं अमेरिकेने म्हटलय. इराण आणि अमेरिकेमध्ये बऱ्याच वर्षांपासून कट्टर शत्रुत्व आहे. पण या दु:खद प्रसंगात इराणने अमेरिकेशी संपर्क साधला होता.
इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. तिथली राजवट उलथवण्यात आली. अमेरिकेला अनुकूल असलेली राजवट सत्तेवरुन गेली. त्यानंतर दोन्ही देशाच्या संबंधात वितुष्ट निर्माण झालं. आज इराण आणि अमेरिकेत कुठेलही राजनैतिक संबंध नाहीयत. दाट धुक्यांमुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. त्यानंतर इराणने अमेरिकेकडे मदत मागितली होती.
मग, इराणची मदत का नाही केली?
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर मीडियाशी बोलताना म्हणाले की, “इराणच्या सरकारने आमच्याकडे मदत मागितली होती. अडचणीच्या काळात जशी आम्ही दुसऱ्या देशांची मदत करतो, तशी इराणची सुद्धा मदत करायची आहे. पण तार्किक कारणांमुळे आम्ही मदत करण्यात असमर्थ आहोत” त्यांनी या बद्दल जास्त माहिती दिली नाही.
ते 40 वर्ष जुनं हेलिकॉप्टर
दोन्ही देशांमध्ये काय संवाद झाला? या बद्दल मॅथ्यू मिलर यांनी विस्ताराने सांगितलं नाही. इराणने रईसी यांचं हेलिकॉप्टर तात्काळ शोधण्यासाठी मदत मागितली होती, असे संकेत मॅथ्यू मिलर यांनी दिले. ज्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे राष्ट्रपती होते, त्याची निर्मिती अमेरिकेने केली होती. ते 40 वर्ष जुनं हेलिकॉप्टर होतं. क्रॅशनंतर बरेच तास हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता, तेव्हा इराणने अमेरिकेकडे मदत मागितली असावी.
त्या चर्चेनंतर हेलिकॉप्टर दुर्घटना
इराण आणि इस्रायलमध्ये शांती संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी, ओमानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांती चर्चा झाली. त्यानंतर ही दुर्घटना झालीय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इराणी नेत्याच्या मृत्यूवर संवेदना व्यक्त केली.