आता तुमची खैर नाही, इस्रायलच्या प्रत्यूत्तरानंतर इराणने दिली धमकी
इराण आणि इस्रायल यांच्यात सध्या तणाव सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघेई यांनी सोमवारी पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ल्याचा इशारा दिला आहे. तेहरान आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व उपलब्ध माध्यमांचा वापर करेल. असं त्यांनी म्हटले आहे.
इस्रायल सध्या हमास आणि हिजबुल्लाह या दोन्ही दहशतवादी गटांच्या विरोधात लढत आहे. हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलने त्यांना संपवण्याची शपथ घेतली होती. हे युद्ध त्यांनी सुरु केले असले तरी त्याचा अंत आम्ही करणार असं इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले होते. इस्रायलने इराणमध्ये जाऊन आपल्या शत्रूची हत्या केल्याने इराण देखील संतापला. त्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलने देखील त्याला उत्तर दिले आणि आता आमचा बदला पूर्ण झाला असून आता इराणने पुन्हा हल्ला करण्याची चूक करू नये असंही म्हटलं आहे.
इराणवर हवाई हल्ल्यानंतर इस्रायलला आता प्रत्युत्तर दिली जाण्याची शक्यता आहे. इस्रायलमधील जेरुसलेम पोस्टने राष्ट्रीय सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, लष्करी लक्ष्यांवर यशस्वी हल्ल्यानंतर ज्यू राष्ट्राकडून बदला घेणे अपेक्षित आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघीस यांनी सोमवारी सांगितले की, तेहरान इराणमधील लष्करी ठिकाणांवर इस्रायलकडून आठवड्याच्या शेवटी झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व उपलब्ध मार्गांचा वापर करेल.
इराणने शनिवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्याला नकार दिला होता आणि म्हटले होते की यामुळे केवळ मर्यादित नुकसान झाले आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मध्यपूर्वेतील व्यापक संघर्षाची भीती पाहता तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
“इराण झिओनिस्ट राजवटीला (इस्रायल) निश्चित आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व उपलब्ध माध्यमांचा वापर करेल,” असे बगई यांनी साप्ताहिक टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्समध्ये सांगितले आहे. त्यामुळे इराणकडून प्रत्युत्तर दिले जाणार असल्याची शक्यता आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी रविवारी सांगितले की, इराणच्या अधिकाऱ्यांनी इराणची शक्ती इस्रायलला कशी दाखवायची हे ठरवावे. इस्त्रायली हल्ल्याला कमी लेखू नये किंवा अतिशयोक्तीही करू नये, असेही ते म्हणाले.
इस्रायली विमानांनी तेहरान आणि पश्चिम इराणजवळील क्षेपणास्त्र कारखाने आणि इतर ठिकाणांवर शनिवारी पहाटे तीन टप्प्यात हल्ले केले होते. इराणने 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराण यांच्यात हे बदला घेण्याचा क्रम सुरु आहे.
इराण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याबरोबर लढत असलेले्या हिजबुल्लाला समर्थन देतो आणि गाझा पट्टीमध्ये इस्रायलशी लढा देत असलेल्या पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला देखील ते समर्थन देतो.
खामेनी यांची धमकी
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ते इराणला ओळखत नाहीत. त्यांना अजूनही इराणी लोकांची ताकद आणि दृढनिश्चय नीट समजलेले नाही. या गोष्टी आपण त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत.
रविवारी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, देशाच्या हवाई दलाने शनिवारी सकाळी इराणच्या क्षेपणास्त्र लक्ष्यांवर हल्ला केला. हा हल्ला अचूक आणि शक्तिशाली होता आणि त्याचे सर्व उद्दिष्ट साध्य केलंय.