इराणने रचला इस्रायलच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट? नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर शनिवारी हल्ला झाला. इस्रायलने दावा केला आहे की, नेतन्याहू यांच्या हत्येचा कट इराणने रचला होता. इराणने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. खाजगी निवासस्थानावर लेबनॉनमधून तीन ड्रोनने हल्ला केला. तीन ड्रोन त्यांच्या घराजवळ आले होते. ज्यातून हल्ला झाला.
शनिवारी हिजबुल्लाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला टार्गेट केले. हिजबुल्लाने नेतन्याहू यांच्या घरावर 3 ड्रोनने हल्ला केला पण इस्रायली सैन्याने हा हल्ला हाणून पाडला. एका इस्रायली अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, इराण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, त्यांना कोणीही रोखू शकत नाही आणि हे युद्ध इस्रायल जिंकणार आहे. दोनच दिवसांपूर्वी इस्रायलने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवारचा खात्मा केला होता. ‘आम्ही अस्तित्वासाठी लढत आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत लढत राहू.’ गाझा आणि लेबनॉनमध्ये युद्ध सुरू ठेवण्याबाबत इशारा देताना नेतन्याहू म्हणाले की, इराणच्या इतर प्रॉक्सी गटांशी लढा सुरूच ठेवणार आहे.
या हल्ल्यासाठी इस्रायलने पुन्हा एकदा इराणला जबाबदार धरले आहे. इस्रायली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात इराणचा सहभाग असल्याची पुष्टी केली आहे. शनिवारी सकाळी हिजबुल्लाहने इस्रायलच्या पंतप्रधानांच्या घराला लक्ष्य केले. तीन ड्रोनने हल्ला केला तेव्हा नेतान्याहू आणि त्यांची पत्नी घरी उपस्थित नव्हते. हे ड्रोन नंतर हेलिकॉप्टरने पाडण्यात आले. तर एक ड्रोन इमारतीला जाऊन धडकले. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
आयडीएफच्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने सिसेरिया शहरातील एका इमारतीला लक्ष्य केले. पण ड्रोन धडकण्यापूर्वी आणि स्फोट होण्यापूर्वी सिसेरिया भागात कोणताही अलर्ट सायरन वाजला नव्हता. त्याची चौकशी सुरु आहे. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यात इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणाही पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचं दिसत आहे. पण सुदैवाने इस्रायली सैन्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ड्रोन पाडल्याने मोठी हानी रोखता आली.
याआधी ऑगस्टमध्ये इस्रायली वृत्तपत्र हायोमच्या वृत्तात असा दावा केला होता की, हिजबुल्लाच्या ड्रोनने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराचे फोटो काढले होते. 19 ऑगस्ट रोजी, नेतन्याहूच्या सिसेरिया व्हिलाजवळ एक हिजबुल्लाहचा ड्रोन दिसला होता. पण सध्या तरी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू सुखरुप असल्याची माहिती आहे.