इराणच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या झाली का? या हत्येमागे कोणत्या देशाचा हात असल्याची शंका
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. जून २०२१ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यांची भूमिका ही नेहमीत वादग्रस्त राहिली आहे. रायसी यांच्या मृत्यूमागे घात की अपघात अशी शंका उपस्थित केली जात आहे. इराणच्या लोकांना कोणावर आहे संशय.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालाय. कट्टरपंथी प्रतिमा असलेले रायसी हे जून 2021 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. या दुर्घटनेत इराणचे परराष्ट्र मंत्री अमिर अब्दुल्लाहियान यांचाही मृत्यू झालाय. इराणमध्ये या दुर्घटनेमागे इस्त्रायलचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. अपघातानंतर सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये लोकं याला षडयंत्र असल्याचे म्हणत आहेत. मोसाद हे सोशल मीडिया X वर ट्रेंड होत आहे. लोकं या दुर्घटनेबाबत आपली मते मांडत आहेत.
घात की अपघात याबाबत शंका
खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. पाऊस आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर भरकटले आणि हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. पण या अपघातामागे घातपाताची शक्यता ही तपासली जात आहे. रायसी यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच इस्राईलबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे या दुर्घटनेमागे देशांतर्गत लोक किंवा इस्रायलसारख्या बाह्य शत्रू शक्तींचा हात आहे का अशी शंका व्यक्त केली जातेय.
इस्रायल आणि इराणमध्ये शत्रुत्व
इराण आणि इस्रायल यांच्यात अनेक दशके जुने शत्रुत्व आहे. काही दिवसांपूर्वीच सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये इराणी जनरलची हत्या झाली होती. ज्यामागे इस्रायलचा हात असल्याचं बोललं जात होतं. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद इराणच्या विरोधात प्रचारासाठी प्रसिद्ध आहे पण एक गोष्ट अशी आहे की मोसादने कधीही कोणत्याही देशाच्या प्रमुखाला लक्ष्य केले नाही.
तज्ञांनी मात्र इस्रायलच्या सहभागाबाबत असहमती दर्शवली आहे. इराणच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांची हत्या म्हणजे युद्ध अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे इस्रायल असे काही करेल असे तज्ज्ञांना वाटत नाही.
हेलिकॉप्टर अपघातामुळे प्रादेशिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणचे लेबनॉन, सीरिया, इराक आणि येमेन सारख्या देशात प्रॉक्सी नेटवर्क आहे. त्यामुळे संघर्ष वाढू शकतो.
या अपघाताची माहिती मिळताच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सचे मुख्य कमांडर हुसेन सलामी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी कोणता घातपात आहे हे तपासले जात आहे. IRGC कमांडर्सनीही घटनास्थळी भेट दिलीये.