600 भारतीय सैनिक तैनात असलेल्या पोस्टवर इस्रायलचा हल्ला, भारताची तातडीने कारवाई
संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेसाठी तैनात असलेल्या पोस्टवर इस्रायलने अचानक हल्ला केला आहे. इस्रायल-लेबनॉन सीमेवर ब्लू लाईन तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारताचे 600 सैनिकही येथे तैनात आहेत. याशिवाय इतर देशांचे देखील सैनिक उपस्थित आहे. या हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाऊलं उचलली आहेत.
इस्त्रायलने गुरुवारी लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) पीसकीपिंग फोर्सच्या पोस्टवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेसाठी इस्रायल-लेबनॉन सीमेवर ब्लू लाईन तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारताचे 600 सैनिकही येथे तैनात आहेत. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यांबाबत भारतानेही चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ते ब्लू लाइनवरील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पीसकीपिंग फोर्सच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. या कारवाईनंतर इटली, फ्रान्स आणि इंडोनेशियासारख्या अनेक देशांनी इस्रायलकडून उत्तर मागितले आहे.
भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी सांगितले की, हिजबुल्लाह संयुक्त राष्ट्राच्या पोस्टच्या आडून इस्रायलवर हल्ला करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांच्या संरक्षणासाठी इस्रायल आवश्यक पावले उचलेल. लेबनॉन आणि इस्रायल सीमेवर दोन प्रकारचे शांती सैनिक तैनात आहेत. यापैकी एकाचे नाव आहे ‘युनायटेड नेशन इंटरिम फोर्स इन लेबनॉन’ म्हणजेच UNIFIL. तर दुसरी ‘युनायटेड नेशन्स डिसंगेजमेंट ऑब्झर्व्हर फोर्स’.
लेबनॉनमध्ये घुसून कारवाई
इस्रायलने १ ऑक्टोबर रोजी लेबनॉनमध्ये घुसून कारवाई सुरु केली होती. यानंतर इस्रायलने यूएन पीसकीपर्सना दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्यास सांगितले होते. मात्र, यूएनने तसे करण्यास नकार दिलाय. यूएनने आरोप केला आहे की इस्रायलने गेल्या 24 तासांत सातत्याने त्यांच्या पोस्टला लक्ष्य केले आहे. इस्रायली सैनिकांनी जाणूनबुजून कॅमेरा आणि लाईटवर गोळी झाडली.
इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, रणगाड्याने हल्ला करण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेच्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला होता. इस्रायलने गुरुवारी बेरूतमधील एका इमारतीवर हवाई हल्ले केले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले कीस, या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला, तर 177 जण जखमी झाले. इस्रायलने अद्याप या हल्ल्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहचे वरिष्ठ सदस्य आणि समन्वय युनिटचे प्रमुख वफिक सफा यांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. मात्र, हल्ल्यातून पळून जाण्यात ते यशस्वी झाले. मध्य बेरूतमध्ये इस्रायलचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.
आखाती देशांचा अमेरिकेवर दबाव
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सौदी अरेबिया, कतार आणि यूएई सारखे अनेक आखाती देश अमेरिकेवर दबाव आणत आहेत. इस्रायलने इराणच्या तेल साठ्यावर हल्ला करु नये म्हणून दबाव आणला जात आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलला त्यांच्या हवाई हद्दीचा वापर करू दिला जाणार नाही, असे देखील या देशांनी म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गुरुवारी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक घेतली. इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यासाठी नेतन्याहूंनी ही बैठक घेतल्याचा दावा सीएनएनने केला होता. यापूर्वी इराणवर पलटवार करण्याबाबत इस्रायलच्या पंतप्रधानांनी ९ ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. बायडेन यांनी इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार असल्याचा पुनरुच्चार केला. एक दिवस आधी बायडेन म्हणाले होते की, इस्रायलने इराणच्या तेल आणि आण्विक ठिकाणांवर हल्ले करणे टाळावे.