Israel Attacks Hezbollah : इस्रायलचा हिज्बुल्लाहवर महाविनाशक हल्ला, एकाचवेळी 100 फायटर जेट्सचा वापर आणि…
Israel Attacks Hezbollah : इस्रायलमध्ये काल एकाबाजूला शोकसभा सुरु होती. त्याचवेळी शेजारच्या देशातून रॉकेट हल्ले सुरु होते. इस्रायल सैन्य दुसऱ्या देशात जमिनी युद्ध लढत आहे. एक देश म्हणून अनेक आघाड्यांवर इस्रायलसाठी संघर्षाची स्थिती आहे. इस्रायलने काल एक महाविनाशक हल्ला केला.
हिज्बुल्लाहने काल इस्रायलवर जवळपास 130 रॉकेट्स डागले. या हल्ल्याला सोमवारीच इस्रायलने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. इस्रायलने हिज्बुल्लाहवर महाविनाशक हल्ला केला. इस्रायलने एकाचवेळी 100 फायटर जेट्सचा वापर केला. इस्रायलने लेबनानमधील हिज्बुल्लाहच्या 120 तळांना टार्गेट केलं. इस्रायली फायटर जेट्सकडून जवळपास 1 तास बॉम्बफेक सुरु होती. अवली नदीपासून दक्षिणेकडे समुद्र किनाऱ्यांवर किंवा नौकांवर राहू नका असा इशारा आयडीएफ प्रवक्त्याने लेबनानच्या नागरिकांना दिला आहे. काल 7 ऑक्टोंबरला हमासने दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं. त्याचवेळी इस्रायलने हिज्बुल्लाह विरोधात एवढी मोठी कारवाई केली.
उत्तर इस्रायलला क्लोज्ड मिलिट्री झोन घोषित केल्याची आयडीएफने सोमवारी घोषणा केली. लेबनानमध्ये इस्रायलची जमिनी कारवाई सुरु झाल्यानंतर हा चौथा क्लोज मिलिट्री झोन आहे. ताज्या हवाई हल्ल्यांबद्दल माहिती देताना आयडीएफने सांगितलं की, “आमच्या विमानांनी हिज्बुल्लाहच्या विभिन्न युनिट्सना टार्गेट करणारे हल्ले केले. यात हिज्बुल्लाहची रादवान फोर्स, मिसाइल रॉकेट फोर्स, इंटेलिजेंस यूनिट आहे”
एकाबाजूला शोकसभा दुसऱ्याबाजूला युद्ध
हिज्बुल्लाहच्या कमांड एंड कंट्रोल आणि फायरिंग क्षमतेला नष्ट करण्यासाठी हा हवाई हल्ला केल्याच आयडीएफने सांगितलं. इस्रायलच्या ग्राऊंड ऑपरेशनमध्ये असलेल्या सैनिकांना आपलं लक्ष्य गाठण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने हे हवाई हल्ले केले. इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरला हल्ल्याच्या वर्षपुर्ती निमित्ताने शोकसभा सुरु होती. दुसऱ्याबाजूला इस्रायली सैन्य अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. इस्रायलने लेबनानमध्ये आपल्या ग्राऊंड ऑपरेशनचा विस्तार केला.
हमासकडूनही रॉकेट हल्ला
7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने इस्रायलमध्ये विविध ठिकाणी शोकसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात इवेंट्सना टार्गेट करण्यासाठी हमासने रॉकेट हल्ला केला. इस्रायलविरोधात युद्ध सुरु ठेवण्याची शपथ घेतली. मागच्या वर्षभरात इस्रायलने गाजा पट्टीत जी कारवाई केली, त्यामुळे रॉकेट डागण्याची हमासची क्षमता प्रचंड कमी झाली आहे. गाजा युद्धात जवळपास 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
हायफा शहर टार्गेटवर
हिज्बुल्लाहकडून काल इस्रायलवर 130 रॉकेट्स डागण्यात आले. इस्रायलमधील हायफा शहराला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला. हायफा हे इस्रायलमधील तिसरं मोठ शहर आहे. येमेनमधील हुती संघटनेने डागलेली मिसाइल्स आयरन डोमने हवेतच नष्ट केली.