हमास-इस्रायलमध्ये 11 दिवसानंतर शांततेची घोषणा; संघर्षविराम पाळला जाणार का?
तब्बल 11 दिवसाच्या रक्तरंजित संघर्षानंतर हमास आणि इस्रायलमध्ये शांततेची घोषणा करण्यात आली आहे. (Israel-Hamas truce takes hold after 11 days of fighting)
गाझा सिटी: तब्बल 11 दिवसाच्या रक्तरंजित संघर्षानंतर हमास आणि इस्रायलमध्ये शांततेची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सुरक्षा कॅबिनेटने गाझापट्टीतील सैन्य अभियानाला रोखण्याच्या एकतर्फी संघर्ष विरामाला मंजुरी दिली आहे. इस्रायलच्या या निर्णयानंतर हा आपला विजय असल्याचं सांगत हमासमध्ये प्रचंड जल्लोष केला जात आहे. तर दुसरीकडे हमास-इस्रायल यांचा हा संघर्ष विराम अधिक काळ टिकणार का? असा सवाल केला जात आहे. (Israel-Hamas truce takes hold after 11 days of fighting)
11 दिवसानंतर इस्रायलने संघर्ष विराम जारी केला आहे. तसं निवेदनच इस्रायलने काढलं आहे. ‘सुरक्षा संबंधित कॅबिनेटची बैठक झाली. त्यात सर्व सुरक्षा दलाचे प्रमुख उपस्थित होते. त्यात इजिप्तच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यात हमासच्या सोबत संघर्ष विराम करण्याची ऑफर देण्यात आली होती. संघर्ष विरामासाठी कोणतीही अट ठेवण्यात आली नव्हती. त्यावर दोन्ही पक्षाने सहमती दाखवली असून आम्ही संघर्ष विराम जाहीर करत आहोत,’ असं इस्रायलने म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्राकडून स्वागत
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी या संघर्षविरामाचं स्वागत केलं आहे. अकरा दिवसापासून सुरू असलेला संघर्ष थांबला याचा आनंद आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी इजिप्त आणि कतारने दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे, असं गुतेरेस यांनी सांगितलं. तसेच या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही देशातील नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदनाही व्यक्त केली आहे.
अमेरिकाही सक्रिय
या दोन्ही देशात युद्ध सुरू असताना अमेरिकाही सक्रिय झाली होती. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी दोन वेळा नेतन्याहू यांना फोन केला होता. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यानेही नेतन्याहूंशी फोनवर संपर्क साधला होता. त्यामुळे इस्रायलवर प्रचंड दबाव वाढला होता.
शांती करार पाळला जाणार?
दरम्यान, इस्रायलने संघर्षविरामाची घोषणा केली असली तरी इस्रायल हा संघर्षविराम पाळणार का? असा सवाल केला जात आहे. इस्रायलने स्वत:हून हमासवर हल्ला केला. त्यानंतर अकरा दिवसांनी इस्रायलने स्वत:हून संघर्षविरामची घोषणा केली. त्यामुळे इस्रायल पुन्हा हमासवर हल्ला न करण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर अमेरिकेसहीत अनेक देशांनी इस्रायलवर दबाव वाढवला होता. त्यामुळे इस्रायल या देशांच्या नजरेत खलनायक ठरला होता, त्यामुळे भविष्यात इस्रायलकडून अशी चूक केली जाण्याची शक्यता कमी आहे, मात्र, दोन्ही देशात अधूनमधून ठिगण्या पडतील. मात्र, त्याचं स्वरुप व्यापक नसेल, असंही राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केलं.
हा आमचा विजय
संघर्ष विराम जाहीर झाल्यानंतर गाझा शहरात एकच जल्लोष करण्यात आला. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून फटाके फोडले. तसेच हमासचा झेंडा फडकवून येथील नागरिकांनी आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली. हा हमासचा विजय आहे. आम्ही इस्रायलवर विजय मिळविला आहे, असं हमासच्या एका नेत्याने सांगितलं.
दोन्हीकडून रॉकेटचा मारा
इस्रायलने गुरुवारी पहाटे गाझापट्टीवर प्रचंड हल्ले केले होते. त्यात एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृ्तयू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. इस्रायलच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमासनेही इस्रायलवर रॉकेट डागले होते. हमासने इस्रायलवर सुमारे हजार रॉकेटचा मारा केला आहे. एका वृत्तानुसार इस्रायल आणि हमासच्या या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत 232 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 65 मुलांचाही समावेश आहे. तर 1900 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात गाझापट्टीला सर्वाधिक आर्थिक नुकसान झालं आहे. या ठिकाणी सुमारे 220 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन मुले, एक सैनिक आणि एका भारतीय महिलेसह दोन थायलंडच्या नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलने हमासवर सुमारे 4 हजार 300 रॉकेटचा मारा केला होता. (Israel-Hamas truce takes hold after 11 days of fighting)
Residents in different areas of the West Bank celebrating victory over #Israel in the latest conflict. pic.twitter.com/fDCQU5tzdj
— Joe Truzman (@Jtruzmah) May 21, 2021
संबंधित बातम्या:
PHOTOS : इस्राईलच्या हल्ल्यात गाझा बेचिराख, हादरवून टाकणारे फोटो
चिनी चॅनलकडून यहुदींवर ‘हे’ गंभीर आरोप, इस्राईलच्या राजदुताकडून आक्षेप, नव्या वादाचं कारण काय?
(Israel-Hamas truce takes hold after 11 days of fighting)