तेल अवीव : इस्त्रायली लष्कर आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. इराणकडून हमासला थेट पाठिंबा मिळाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासच्या तळांना उद्धस्त करण्याचा इशारा दिला आहे. हमास आणि इस्रायली लष्कर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगापुढे नवं संकट उभे राहिले आहे. लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने अनेक तोफगोळे डागण्यात आले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने तोफांचा मारा केलाय.
इस्रायली सैन्याने गाझामधील हमासच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ला केला आहे. इस्रायली मीडियानुसार, याह्या सनवर, निझार अवदल्ला, फाथी हमद, इत्साम अल-डेलिस, कमाल अबू अवान आणि अबू मुआज सराज यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर तातडीची बैठक झाली. UNSC चे 15 वर्तमान सदस्य रविवारी न्यूयॉर्कमधील UN मुख्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित होते.
इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात इस्रायली सुरक्षा दलांनी हमासच्या अज्ञात दहशतवाद्यांना पकडले किंवा ठार केले. गाझामधून घुसखोरी करणाऱ्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू असल्याचे इस्रायली माध्यमांनी सांगितले. किबुत्झ बेरी परिसरातील एका डायनिंग हॉलमध्ये ओलीस घेतलेल्या इस्रायली नागरिकांच्या गटाची सुटका करण्यात आली आहे. ज्या दोन दहशतवाद्यांनी त्याला पकडले होते ते ठार झाले आहेत.
हमासचे प्रवक्ते गाझी हमाद यांनी बीबीसीला सांगितले की, इराणने इस्रायलवर शनिवारी झालेल्या हल्ल्याला पाठिंबा दिला. या हल्ल्याला इराणचा थेट पाठिंबा होता.