Israel – Hamas War : इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमास या दशतवादी संघटनेकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले होते. दोन देशांमधील या युद्धात जग दोन गटात वाटले गेले आहे. काही देश इस्रायलच्या सोबत आहेत तर काही देश पॅलेस्टिनला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल इस्रायलमध्ये जात जगाला संदेश दिला की ते इस्रायलच्या मागे भक्कमपणे उभा आहे. काही देश हे उघडपणे पाठिंबा देत नसले तरी त्यांचा छुपा पाठिंबा आहे. यामध्ये आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. कारण हमासच्या दहशतवाद्यांनी ज्या शस्त्रांचा वापर केला ते शस्त्र कोणत्या देशाचे होते याबाबत मोठा खुलासा झाला आहे.
हमासच्या दहशतवाद्यांकडे असलेले शस्त्र हे उत्तर कोरियाचे असल्याचं पुढे आलं आहे. इस्रायलने दहशतवाद्यांचे शस्त्र ताब्यात घेतल्यानंतर ही गोष्ट पुढे आली आहे. मात्र, उत्तर कोरियाने दहशतवादी संघटनेला शस्त्रे विकल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
उत्तर कोरियाच्या शस्त्राबाबत तज्ञांनी विश्लेषण केले. हमासने हल्ला करण्यासाठी जे F-7 रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड वापरले. ते उत्तर कोरियाचे असल्याचा आरोप होत आहे. सीरिया, इराक, लेबनॉन आणि गाझा पट्टीमध्ये F-7 आढळले आहे. यावरुन उत्तर कोरियाने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला आहे असा आरोप आता होत आहे.
हमासच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचे फोटो ही प्रसिद्ध केले आहेत ज्यात दहशतवादी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि F-7 सारखी इतर शस्त्रे चालवताना दिसत आहेत.
इस्रायली सैन्याने रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडच्या निर्मात्याबद्दल आणि त्याच्या स्त्रोताबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. हमाससोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.
अमेरिका सारखा देश इस्रायलच्या मागे उभे राहिल्याने अमेरिकेच्या विरोधातील देश साहजिकच शत्रूचा शत्रू आपला मित्र अशा भूमिकेत दिसत आहेत. आखाती देश पण पॅलेस्टिनच्या बाजुने उभे राहिले आहेत.