Israel-Hamas War | इस्रायल-हमास युद्धात अवघ्या 20 वर्षांचा भारतीय वंशाचा सैनिक शहीद
Israel-Hamas War | इस्रायल-हमास युद्धात एक 20 वर्षांचा भारतीय वंशाचा सैनिक शहीद झाला. सध्या इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. इस्रायली सैन्य गाजा पट्टीत घुसलं आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांचा या युद्धात मृत्यू झालाय. इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ले केला. त्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली.
जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु झालेल्या युद्धाला एक महिना होणार आहे. या युद्धात इस्रायल हमासवर जोरदार हल्ले करत आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात भारतीय वंशाच्या एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झालाय. इस्रायलमधील डिमोना शहराच्या महापौर बेनी बिट्टन यांनी ही माहिती दिली. मेयर बेनी बिट्टन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टाफ सार्जेंट हलेल सोलोमन या सैनिकाच नाव आहे. हलेल सोलोमन दक्षिण इस्रायलच्या डिमोना शहरात राहत होता. बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करुन मेयरने ही दु:खद बातमी दिली. गाजा पट्टीत युद्ध लढताना डिमोनाच्या हलेल सोलोमनचा मृत्यू झाला, असं मेयर बेनी बिट्टन यांनी म्हटलं आहे.
हलेल सोलोमन यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असं बेनी बिट्टन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय. “या दु:खद प्रसंगात हलेल सोलोमन यांचे आई-वडिल रोनिल, मोर्दचाई, त्यांची बहिण यास्मीन, हिला, वेरेड आणि शेक्ड यांच्यासोबत मी आहे” असं बेनी बिट्टन यांनी लिहिलय. “हलेलला सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे गिवती बिग्रेडमध्ये दाखल झाला. हलेल एक समर्पित मुलगा होता. त्याच्या मृत्यूने डिमोना शहर शोकसागरात बुडालय” असं महापौर बेनी बिट्टन यांनी म्हटलय.
डिमोनाला ‘मिनी इंडिया’ का म्हणतात?
डिमोना हे इस्रायलच्या दक्षिणेला असलेला एक छोटस शहर आहे. डिमोनाल इस्रायलची अणूभट्टी म्हणून ओळखल जातं. इथे भारतातून आलेले ज्यू मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे काही लोक डिमोनाला ‘मिनी इंडिया’ सुद्धा बोलतात. हलेल सोलोमनच्या मृत्यूवर भारतीय समुदायाच्या लोकांनी दु:ख व्यक्त केलय. हलेल सर्वांशी मिळून-मिसळून राहणारा एक युवक होता. त्याच भविष्य उज्वल होतं. हे इस्रायलच्या अस्तित्वाच युद्ध आहे, असं भारतीय वंशाच्या नागरिकांच म्हणणं आहे. युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आलं. 7 ऑक्टोबरला हमासचे दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली आहे.