Israel-Hamas War : इस्रायलला सर्वात मोठं यश, हमासचा टॉप कमांडर एअरस्ट्राईकमध्ये ठार
इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता प्रचंड टोकाला पोहोचलं आहे. इस्रायलने गाजा पट्टीत एअरस्ट्राईक सुरू केला आहे. या हल्ल्यात अनेक अतिरेकी मारले गेले आहे. हमासचा एक टॉप कमांडरही ठार झाला आहे.
तेल अविव | 15 ऑक्टोबर 2023 : हमासच्या हवाई विंगचा प्रमुख अबू मुराद याला कालच इस्रायलने कंठस्नान घातलं होतं. त्यानंतर इस्रायलला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. इस्रायलने आणखी एका बड्या अतिरेक्याला ढगात पोहोचवलं आहे. हमासच्या एका बड्या कमांडरला एअरस्ट्राईकमध्ये इस्रायलने त्याला कंठस्नान घातलं आहे. शनिवारी रात्री इस्रायलने हमासवर एअरस्ट्राईक केला. त्यात हा अतिरेकी मारला गेला. इस्रायलसाठी हे मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.
हमासच्या दक्षिणी खान यूनिस बटालियनमध्ये नहबा दलाचा टॉप कमांडर बिलाल अल कदरा याला ठार करण्यात आलं आहे. इस्रायलच्या विमानांनी शनिवारी रात्री गाजा पट्टीतील हमासच्या दक्षिण खान यूनिस बटालियनवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक अतिरेकी मारले गेले. त्यात बिलाललाही ठार मारण्यात आलं आहे. अनेक लोकांच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. घराघरात घुसून लोकांना तो शोधून शोधून मारायचा. घरातील एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही यावर त्याचा भर असायचा. त्यामुळे त्याच्या बद्दलची नागरिकांमध्ये दहशत होती. लोक त्याला घाबरायचे. हमाससारख्या दहशतवादी संघटनेत काम करतानाच तो पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहाद संघटनेतही सक्रिय होता. अखेर त्याला मारण्यात इस्रायलला यश आलं आहे.
अनेक वास्तू जमीनदोस्त
इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेजने याबाबतची माहिती दिली आहे. आयडीएफने जेयतून, खान यूनिस आणि पश्चिम जाबलियाच्या शेजारील शंभरहून अधिक ठिकाणी हल्ला चढवला. इतकेच नव्हे तर अतिरेकी ज्या ठिकाणाहून इस्रायलवर हल्ला करतात अशा हमासच्या ऑपरेशन स्थळांवरही इस्रायलने हल्ला चढवला आहे.
इस्रायलने हमासवर भीषण हल्ला केला आहे. इस्लामिक जिहाद परिषदेचं कार्यालय, कमांड सेंटर, सैन्य परिसर, डझनभर लाँचर पॅड, अँटिक पोस्ट आणि वॉच टॉवर इस्रायलने नेस्तनाबूत केला आहे. या एअरस्ट्राईकमध्ये पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेच्या सैन्य मुख्यालयालाही नष्ट करण्यात आलं आहे. आयडीएफने हमासच्या अनेक वास्तू उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे हमासचं कंबरडं मोडलं आहे.
नागरिकांना 24 तासांची मुदत
दरम्यान, हमाससोबत युद्ध सुरू असतानाच इस्रायलने पॅलेस्टाईनच्या लोकांना उत्तर गाजा खाली करण्यासाठी नागरिकांना 24 तासांची मुदत दिली आहे. गाजातील लोकांनी आपल्या सुरक्षेसाठी गाजा पट्टीतील दक्षिणेकडे जाऊन राहावं, असं आयडीएफने म्हटलं आहे. त्यामुळे गाजा पट्टीतील लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत.
वीज, पाणी तोडलं
याशिवाय इस्रायलने गाजा पट्टीतील वीज आणि पाणी पुरवठा बंद केला आहे. दुकानातील रेशन संपलं आहे. लोकांकडे खाण्यासाठी काहीच नाहीये. त्यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी गाजा पट्टी सोडत आहेत. तर हमास त्यांना बंदुकीच्या धाकावर रोखत आहे. त्यामुळे गाजा पट्टीतील लोक अधिकच भयभीत झाले आहेत. इस्रायलने लवकरच ग्राऊंड ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच नागरिकांना दुसरीकडे जाण्यास सांगितलं जात आहे.