Israel-Hamas war | इस्रायल-हमास युद्धाचा भारताला असा होऊ शकतो मोठा फायदा
Israel-Hamas war | युद्ध जास्त खेचलं गेलं, तर भारताला होणार हे फायदे. इस्रायल-हमास युद्धाचा आज सहावा दिवस आहे. ताज्या रिपोर्ट्नुसार, आतापर्यंत दोन्ही बाजूच्या 2,300 जणांचा मृत्यू झाला आहे.
जेरुसलेम : इस्रायल-हमास युद्धाला आता सुरुवात झालीय. येणाऱ्या दिवसात हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. हे युद्ध आणखी भीषण होत गेलं, तर इस्रायलमधील जागतिक कंपन्या आपला तिथला बिझनेस गुंडाळू शकतात. युद्ध आणखी वाढलं, तर खासकरुन टेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपन्या भारत, मध्य पूर्वेतील देश किंवा पूर्व युरोपकडे आपला मोर्चा वळवू शकतात. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिलय. जिथे टॅलेंट आहे, त्या भागात हे बिझनेस शिफ्ट होतील, असं एक्सपर्ट्सच मत आहे. इस्रायलमध्ये 500 जागतिक कंपन्या आहेत. यात मायक्रोसॉफ्ट, इंटेल आणि गुगल या नावाजलेल्या कंपन्या आहेत. विप्रो आणि TCS या भारतीय कंपन्यांच बिझनेस सुद्धा इस्रायलमध्ये आहे. इस्रायलमध्ये जवळपास 1 लाख लोक या कंपन्यांमध्ये नोकरी करतात.
हाय-टेक इंडस्ट्रीज हे इस्रायलमध्ये वेगाने वाढणार क्षेत्र आहे. या क्षेत्राला युद्धाचा फटका बसू शकतो. इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसण्याच्या तयारीत आहे. असं झाल्यास मोठ्या घनघोर युद्धाला सुरुवात होईल. चीपमेकर इंटेल ही इस्रायलमधली सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “ते इस्रायलमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पावल उचलत आहोत” शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायमध्ये घुसून हैदोस घातला. 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांनी यामध्ये आपले प्राण गमावले. अनेकांना बंधक बनवलं, ते हमासच्या ताब्यात आहेत.
‘पुरुष आणि महिलांना जिवंत जाळलं’
इस्रायल-हमास युद्धाचा आज सहावा दिवस आहे. ताज्या रिपोर्ट्नुसार, आतापर्यंत दोन्ही बाजूच्या 2,300 जणांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोक विस्थापित झाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रात्री उशिरा देशाला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हमासला मूळापासून संपवण्याचा संकल्प बोलून दाखवला. “आमच्या मुला-मुलींच्या डोक्यात गोळ्या घातल्या. पुरुष आणि महिलांना जिवंत जाळलं. तरुण महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या केली. सैनिकांचा शिरच्छेद केला” असं नेतन्याहू म्हणाले.